बॉलीवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याचा अगामी चित्रपट ‘टायगर ३’ मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरनंतर चाहते आता चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.
भारतात ‘टायगर ३’च्या अॅडव्हान्स बुकिंगला ५ नोव्हेंबर २०२३ पासून सुरुवात झाली. अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यापासून २४ तासांमध्ये ‘टायगर ३’ची सुमारे एक लाख ४० हजार तिकिटे विकली गेली होती. आत्तापर्यंत या चित्रपटाची २ लाख ६६ हजार ९९५ तिकिटे विकली गेली आहेत. अॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून चित्रपटाने ७. ४६ कोटींचा व्यवसाय केला आहे.
चित्रपटगृहांत २४ तास चालणार शो
नवी दिल्लीतील रिंग रोडमधील चित्रपटगृहांनी २४ तास ‘टायगर ३’ चे शो चालवणार असल्याचे जाहीर केले आहे. मध्यरात्री २ वाजल्यापासून या चित्रपटाचे शो आयोजित करण्यात येणार आहे. देशातील अनेक भागांमधून चाहत्यांनी ‘टायगर ३’ चे २४ तास शो चालवण्याची मागणी केली आहे. तसेच दुबईतील वॉक्स सिनेमा चित्रपटगृहात रात्री १२.०५ वाजता टायगर ३ चा शो आयोजित केला आहे. तर सौदी अरबमध्ये मध्यरात्री २ वाजता या चित्रपटाचे शो दाखवण्यात येणार आहे.
टायगर ३ १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘टायगर’ व ‘टायगर जिंदा है’प्रमाणेच या चित्रपटातही सलमान आणि कतरिनाचा अॅक्शन अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सलमान, कतरिनाबरोबरच इमरान हाश्मीचीही मुख्य भूमिका आहे. इमरानने या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली आहे. ‘टायगर ३’मध्ये सलमान आणि कतरिनाबरोबर इमरानचेही अॅक्शन सीन्स बघायला मिळाणार आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर ३’ हिंदीबरोबरच तमीळ व तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे.