एरव्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर पोलिस कर्मचाऱ्यांना सॅल्युट ठोकून ‘हजर’ व्हावे लागते. मात्र, रविवारी (ता. १२) पोलिसांनी अगदी वेगळे चित्र अनुभवले. पोलिस कर्मचारी आपल्या कर्तव्यस्थळी असताना खुद्द पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर (Nand Kumar Thakur) दिवाळी फराळ घेऊन त्यांच्यासमोर ‘हजर’ झाले. पोलिस अधीक्षकांनी दिवाळी फराळाचे ‘गोड गिफ्ट’ हाती ठेवल्यामुळे पोलिसही आनंदून गेले.
संवेदनशिल जिल्ह्यात नेहमीच काही ना काही घडते. त्यामुळे पोलिस (Police) दलावर प्रचंड तणाव असतो. त्यात मागचे दोन महिने आणि विशेषत: मागचा पंधरवाडा जिल्हा पोलिस दल व शहर पोलिसांसाठी आव्हानात्मक गेला. मराठा आरक्षणाचे आंदोलन, जाळपोळ व दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे गुन्हे, त्यात गंभीर कलमे आणि मग संशयितांची धरपकड. त्यात राजकीय नेत्यांच्या एकामागून एक चकरा असल्याने त्यांनाही संरक्षण पुरविणे असे अनेक आव्हाने जिल्हा पोलिस दलाने पेलले.
त्यात कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. आता परिस्थिती पुर्वपदावर आली आहे. प्रत्येकजण आपापल्या कुटूंबियांसोबत दिवाळी साजरी करत आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बांधवांना मात्र आपल्या कर्तव्यावर हजर रहावे लागत आहे. रविवारी पोलिस आपापल्या कर्तव्यस्थळी ड्युटी करत असताना सहाजिकच आपण कुटूंबियांसोबत नाहीत याची पुसटशी खंत मनात असणारच. पण, त्यांच्या कुटूंबाचे प्रमुख असलेले पोलिस अधीक्षक स्वत: त्यांच्यासाठी व कुटूंबियांसाठी फराळ घेऊन पोचले.
दरम्यान, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा चौक, नगर नाका, बार्शी नाका आदी प्रमुख ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना फराळ वाटप केल्यानंतर नंदकुमार ठाकूर यांनी पोलिस कुटूंबियांची पोलिस कॉलनी गाठली. त्यांच्या कुटुंबियांनाही फराळ आणि मुलांना फटाके दिले.