कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवून तब्बल १९ लाख ५५ हजार ६२० रुपयांची फसवणूक करून धमकी ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी तिघांना अटक केली. अर्चना दिगंबर पाटील (रा. संभाजीनगर, कोल्हापूर), अमोल अरुण काटे (रा. पारीजात सोसायटी इचलकरंजी) आणि अमर त्रिभुवन मोदी (रा. हडपसर पुणे, सद्या. रा. नागाळा पार्क कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी रंजना सर्जेराव बांद्रे ( वय ४५ रा. नेर्ली) यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, नेर्ली (ता. करवीर) येथील रंजना बांद्रे आणि त्यांचे पती सर्जेराव बांद्रे यांचा फौंड्रीचा व्यवसाय असून व्यवसायासाठी एका सहकारी
बँकेतून त्यांनी २५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सदर कर्ज प्रकरण थकबाकीत गेल्यामुळे कर्ज फेडण्यासाठी ते नवीन कर्ज काढण्याच्या प्रयत्नात होते. त्यातून त्यांची संदीप सरनाईक यांच्या माध्यमातून अर्चना पाटील, अमोल काटे यांची भेट झाली. त्यांनी बांद्रे यांना १ कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवत विश्वास संपादन केला. आणि त्यानंतर कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेसाठी वेळोवेळी बांद्रे यांच्याकडून १९ लाख ५५ हजार ६२० रुपये घेतले. पण पैसे घेतल्यानंतरही कर्ज मंजुर केले नाही.
शिवाय अमर मोदी या खाजगी सावकाराची भेट घालून मासिक २० टक्के व्याजाने कर्ज मिळवून देतो असे सांगितले. त्यासाठी मोदी यांनी १०० रुपयाचा स्टॅम्प आणि २ कोऱ्या धनादेशासह महत्वाची कागदपत्रे घेतली. मोदी याच्याकडून घेतलेल्या रकमेची व्याजासह परतफेड करूनही अर्चना पाटील, अमोल काटे आणि अमर मोदी हे तिघेजण गुंडाकरवी कर्ज वसुलीसाठी धमकी देत आहेत. याप्रकरणी बांद्रे यांच्या फिर्यादीनुसार तिघांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी यातील तिघा संशयितांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.