कोल्हापूर येथील शाहू मैदानावर रंगलेल्या श्री शिवाजी तरुण मंडळ विरुध्द पाटाकडील तालीम ‘अ’ या संघांतील अटीतटीच्या सामन्यात अतिउत्साही व हुल्लडबाज समर्थकांनी दगड, बाटल्यांसह चपला मैदानावर भिरकावल्या. या प्रकाराने मैदानावर गोंधळ व तणाव निर्माण झाला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमाव पांगवला.
श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ संघांदरम्यान झालेल्या सामन्यात दगडफेक झाली. अटीतटीच्या ठरलेल्या सामन्यात अतिउत्साही समर्थकांनी अर्वाच्च शिवीगाळ केली. प्रेक्षकांच्या या कृतीमुळे मैदानावरील खेळाडूंमध्येदेखील जुंपली. अशातच समर्थकांनी विरुद्ध संघाच्या खेळाडूंना प्रेक्षक गॅलरीतून शिवीगाळ करण्यास सुरुवात कली.
दोन्ही बाजूच्या समर्थकांनी अर्वाच्च शिवीगाळ करत थेट मैदानावर बाटल्या, चप्पल, दगड भिरकावले. त्याला खेळाडूंनीही प्रत्युत्तर दिले. असे दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून वारंवार होत राहिले. दगड लागल्यामुळे काही समर्थक जखमीही झाले. यामुळे मैदान परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. अखेर परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला.
प्रेक्षक गॅलरीमध्ये असणारा गिलावा फोडून त्याचा वापर दगडाप्रमाणे करण्यात आला. समतल असणारे हे तुकडे मैदानावर लांब पल्ला गाठत होते. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तरीही मैदानाबाहेर चौकामध्ये समर्थक तळ ठोकून होते.