सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रविवारी (ता. ३१) पोलिस आयुक्तालयाने शहरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला आहे. यासाठी ७० स्टॅटिक पॉइंट, १३ ठिकाणी नाकाबंदी, बॅरिकेटचे नियोजन केले आहे. तर उत्साहात कोणी अनुचित वर्तन केल्यास कारवाईचा इशारा पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी दिला आहे.
३१ डिसेंबर रोजी इंग्रजी कॅलेन्डर वर्षाचा शेवटचा दिवस आहे. मध्यरात्री १२ नंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात विशेषतः तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.
उत्साहामध्ये तरुण मुले – मुली रस्त्यावर पायी, दुचाकींवर फिरतात. अतिउत्साहात अपघात घडू शकतात. तसेच दारू प्राशन करुन गाडी चालविणे, ट्रिपल सीट दुचाकीवर फिरत आरडाओरडा, महिलांची छेडछाड, बीभत्स वर्तन केल्यास संबधितांवर कारवाई केली जाईल.
रस्त्यांवर महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला गस्ती पथक, दामिनी पथक नेमले आहे. शहरात रहदारीवर नियंत्रणासाठी ठिकठिकाणी बॅरिकेटिंगची व्यवस्था केली आहे. शहरात सोनसाखळी चोरी व महिला सुरक्षिततेसाठी गुन्हे शाखेचे पथक नेमले आहे.
या ठिकाणी पथकांची नेमणूक
सोलापूर शहरात एकूण ७० स्टॅटिक पॉइंट, १३ ठिकाणी नाकाबंदी व बॅरिकेट लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सात रस्ता, नई जिंदगी येथे स्ट्रायकिंग फोर्स व दंगा नियंत्रण पथक नेमलेले आहे.
सोशल मीडियावर पोलिसांची नजर
आक्षेपार्ह संदेश व्हायरल करू नये, यासाठी सोशल मीडिया सर्व्हेलन्स पथकाद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. संदेश व पोस्टमुळे कोणतीही अनुचित घटना घडून बकायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची सर्वानी दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.
ब्रिथ ॲनालायझर, ध्वनिमापकाद्वारे तपासणी
मद्यप्राशन करुन फिरणाऱ्यांची ब्रिथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली जाणार आहे. दुचाकीचे सायलन्सर काढून आवाज करत फिरण्यामुळे ध्वनिप्रदूषण होते. अशा वाहनांची ध्वनीमापकाद्वारे तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी पथकांची नेमणूक केली आहे.
बंदोबस्तासाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी
पोलिस उपायुक्त तीन, सहायक पोलिस आयुक्त सहा, पोलिस निरीक्षक २२, सहायक पोलिस निरीक्षक, फौजदार ४६, पोलिस अंमलदार ७३५