Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रजिद्दीला सलाम! दोन हात नसताना हा विद्यार्थी पायाने देतोय बारावीचे पेपर, दहावीचे...

जिद्दीला सलाम! दोन हात नसताना हा विद्यार्थी पायाने देतोय बारावीचे पेपर, दहावीचे गुण पाहून तुम्ही कराल कौतुक

नांदेड जिल्ह्यातील एका तरुण विद्यार्थ्याने आपल्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर अपंगत्वावर मात करत संपूर्ण समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. दोन्ही हात नसतानाही पायाने लिहून बारावीची परीक्षा देणारा 19 वर्षीय सूरज शिवराज उबाळे आज अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

 

सूरज शिवराज उबाळे हा नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवासी आहे. त्याचा जन्मच दोन्ही हात नसलेल्या अवस्थेत झाला. मात्र या अपंगत्वाने त्याच्या आयुष्याला कधीच थांबवले नाही. लहानपणापासूनच सूरजच्या आई-वडिलांनी त्याला सामान्य मुलांप्रमाणेच शिक्षणाची संधी दिली.

 

सूरजला बालपणी गावातील जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्यात आले. तिथेच पहिलीच्या वर्गातील शिक्षिकेने सूरजमधील जिद्द ओळखली. त्यांनी त्याला पायाने लिहिण्याचा सराव करून घेतला. त्या दिवसापासून सूरजने पायाने लिहिण्याची सवय लावली आणि आज तो अत्यंत सहजतेने पायाने लिहू शकतो.

 

सूरजने पाचवीपर्यंतचे शिक्षण गाडेगावात पूर्ण केले. पुढे शिक्षणासाठी तो नांदेड शहरातील अपंग शाळेत गेला. जिथे त्याने सातवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर डोंगरगाव येथील अपंग शाळेत शिक्षण घेत दहावीपर्यंतचा टप्पा पूर्ण केला. दहावीच्या परीक्षेत सूरजने 64 टक्के गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

 

दहावीनंतर सूरजने कला शाखेत अकरावीचे शिक्षण घेण्यासाठी कंधार येथील श्री शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शारीरिक अडचणींमुळे तो रोज कॉलेजला जाऊ शकत नाही. मात्र तो घरीच राहून दररोज चार तास नियमित अभ्यास करतो. त्याच्या या शिस्तबद्ध अभ्यासामुळेच आज तो आत्मविश्वासाने बारावीची परीक्षा देत आहे.

 

सध्या सूरजची बारावीची परीक्षा सुरू असून, तो कंधार येथील श्री शिवाजी कॉलेजमध्येच परीक्षा केंद्रावर परीक्षा देत आहे. विशेष बाब म्हणजे, हात नसतानाही तो पायाने शंभर गुणांचा पेपर अवघ्या तीन तासांत पूर्ण करतो. पायाने लिहिताना त्याला कोणताही त्रास होत नाही. उलट, तो अगदी सहज आणि आत्मविश्वासाने उत्तरे लिहितो. हे पाहून शिक्षक आणि परीक्षा केंद्रावरील कर्मचारीही अचंबित झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -