पोत बांधून पकडलेले (pigeon) कबूतर लहान भावाने सोडून दिल्याने मोठ्या भावाला राग अनावर झाला. त्याने रागाच्या भरात लहान भावाला मारहाण केली. इतकंच नाही, तर त्याचा गळा आवळून खून देखील केला. हत्येनंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला.
याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना अकोला जिल्ह्यातील पिंजर गावात घडली. शेख अफ्फान शेख अय्युब (वय ७ वर्ष) असं हत्या झालेल्या लहान भावाचे नाव आहे.
अकोला जिल्ह्यातील पिंजर गावात 19 डिसेंबर रोजी 7 वर्षांचा अफ्फान शेख खेळायला गेला होता. यानंतर तो घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र कुठेही माहिती मिळू शकली नाही. यानंतर पिंजर पोलीस ठाण्यात अफ्फान बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.
या घटनेनंतर तब्बल 12 दिवसांनी अफ्फानचा मृतदेह गावाजवळील विहिरीत तरंगताना दिसला. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढला असता तो 7 वर्षीय अफ्फान शेखचा असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
तपासादरम्यान या घटनेमागे कट असल्याचा संशय पोलिसांना आला. अशा गुंतागुंतीच्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. यासोबतच शवविच्छेदन अहवालाचीही प्रतीक्षा होती. अफ्फानला गळा दाबून मारण्यात आले आणि नंतर त्याचा मृतदेह विहिरीत टाकला असे अहवालातून उघड झाले.
संशयाच्या आधारे पोलिसांनी अफ्फानच्या 17 वर्षीय अल्पवयीन चुलत भावाला ताब्यात घेऊन आणि त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर त्याने हे कृत्य स्वत: केल्याची कबुली दिली.
अकोला गुन्हे शाखेचे अधिकारी शंकर शेळके यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अफ्फान आणि त्याचा चुलत भाऊ कबूतर पकडण्यासाठी गावाजवळील शेतात गेले होते. अफ्फानला त्याच्या चुलत भावाने गोणी दिली होती. यानंतर त्याला खिडकीजवळ उभे केले आणि (pigeon) कबुतर येताच गोणी त्यांच्यावर टाकून पकडण्यास सांगितले.
पण अफ्फानला गोणी नीट धरता आली नाही. यामुळे सर्व कबुतरं उडून गेली. या रागाच्या भरात त्याने खिडकीतून अफ्फानचा गळा आवळून त्याला विहिरीत ढकलले. यामुळे त्याचा मृत्यू झाला. आता पोलिसांनी अल्पवयीन मुलाला न्यायालयात हजर करण्याची तयारी केली आहे.