काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारता जोडो न्याय यात्रेवर आहेत. सध्या त्यांची यात्रा आसाममध्ये आहे. या दरम्यान नगांव येथील एका मंदिरात आपल्याला प्रवेश देण्यात आलेला नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. मला मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. मंदिरात जाऊन मी फक्त प्रार्थना करणार होतो असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
मंदिरात जाण्यापासून रोखल्यानंतर राहुल गांधी हे धरणे आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे अन्य नेते आणि समर्थक धरणे आंदोलनाला बसले आहेत.राहुल गांधी यांनी मंदिरात जाण्यापासून रोखल्यानंतर आपल्या मनातील संताप व्यक्त केला. त्यांनी अधिकाऱ्यांना विचारलं की, मंदिरात कोण जाणार? हे आता पंतप्रधान ठरवणार का?. आम्हाला कुठली समस्या निर्माण करायची नाहीय, फक्त मंदिरात जाऊन पूजा करायची आहे असं राहुल गांधी म्हणाले.नेमक काय घडलय?
काँग्रेसची न्याययात्रा आसाममध्ये आहे. आज राहुल गांधी आसामच्या वैष्णव विद्वान श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थानी पूजा-अर्चना करणार होते. आसामच्या बोरदोवा ठाणा क्षेत्रातील हे पवित्र स्थळ आहे. नागांव जिल्ह्यात हे स्थळ आहे. श्रीमंत शंकरदेव यांच हे जन्म स्थान आहे. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, “हे सर्व राज्य सरकारच्या दबावाखाली सुरु आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांनी मंदिर मॅनेजमेंटकडून वेळ मागितला होता. मंदिर व्यवस्थापकांना कोणतीही अडचण नव्हती. पण आता राज्य सरकारच्या दबावानंतर हे सर्व सुरु आहे”‘मंदिरात फक्त एका व्यक्तीला जायला परवानगी आहे’
“आधी आम्हाला सकाळी सात वाजता यायला सांगितलं होतं. पण आता सांगतायत की, दुपारी तीन वाजेपर्यंत मंदिरात प्रवेश मिळणार नाही” असं जयराम रमेश म्हणाले. राहुल गांधी या सगळ्यावर म्हणाले की, ‘मंदिरात फक्त एका व्यक्तीला जायला परवानगी आहे’