कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक जवळ येत असल्याचे त्यात रंगत भरत आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील आज शक्तिप्रदर्शनाने अर्ज भरणार आहेत. सकाळी १२ वाजता धैर्यप्रसाद हॉल येथे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य एकत्र येणार असून ते ११ वाजता अर्ज दाखल करणार आहेत. कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी निश्चित मानली जात होती. ती औपचारिकता पुर्ण झाली आहे.
मात्र, भाजपकडून महाडिक कुटुंबातील कुणाला उमेदवारी द्यायची यावर खलबते सुरू होती. शौमिका महाडिक यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता होती. मात्र, अखेरच्या क्षणी माजी आमदार अमल महाडिक यांना उमेदवारी दिली गेली. याची अधिकृत घोषणा अद्याप केली नसली तरी सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक असा सामना रंगणार आहे.
२०१९ पूर्वी राज्यात भाजपची सत्ता आसल्याने राज्यात ठिकठिकाणच्या नगरपरिषदा, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये पक्षाचे सदस्य निवडून आणले. त्यामुळे काही ठिकाणी भाजपचे पारडे जड आहे. काही नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका जवळ आल्याने अनेक सदस्यांचे डोळे विधानपरिषद निवडणुकीकडे लागले होते. आता पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात पाटील विरुद्ध महाडिक असा सामना रंगणार असल्याने राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिले आहे. एकीकडे भाजपच्या विजयाचा दावा हा ठिकठिकाणच्या संख्याबळावर केला जात आहे. मात्र, सतेज पाटील यांनी याआधीच तयारी सुरू केली आहे. त्यामुळे हा सामना चांगला रंगेल अशी चिन्हे आहेत.