जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री सलग दुसर्या दिवशी नदीकाठाला तसेच पूर्वभागाला वादळी पावसाने झोडपून काढले. सांगली, बुधगाव, तासगाव भागात रात्रभर ढगांचा गडगडाट होता. दरम्यान, या पावसाने अनेक ठिकाणी शेतात, उभ्या पिकांत पाणी साचले आहे. त्यामुळे नुकतीच गती घेत असलेल्या बागायती टापूतील ऊसतोडी काही भागात ठप्प झाल्या.
जिल्ह्यात नदीकाठासह व तासगाव तालुक्यासह खानापूर, आटपाडी भागाला रात्री अवकाळी पावसाने झोडपून काढले. यात प्रामुख्याने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. निंबळक, ढवळी, राजापूरसह भागातील द्राक्षबागांमध्ये या पावसाने फुलोरा गळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी द्राक्षमण्यांना तडे जाण्याचे संकट ओढवले आहे. या धोक्याने बागायतदार चांगलाच हबकला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.
मात्र रात्री या सार्याच भागात दमदार पाऊस झाला. वारणा काठात चिकुर्डेपासून ऐतवडे, बागणी, तांदुळवाडी, दुधगाव या सार्याच वारणा काठाच्या भागात शिवाराला पावसाने झोडपून काढले.
खानापूर तालुक्यात देखील वेगाच्या वार्यासह पाऊस झाला. तालुक्यात भाळवणीसह चिखलगोठण टापूत पावसाचा जोर जास्त होता. या पावसाने भाजीपाला शेतीला मात्र चांगलाच फटका बसला आहे.