बिऊर (ता. शिराळा) येथे मोटरसायकला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वृद्ध ठार झाला. हा अपघात शुक्रवारी झाला. मोहन आनंदा पाटील (वय ६०, रा. तडवळे, ता शिराळा) असे वृद्धाचे नाव आहे.
याप्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहन पाटील मोटरसायकलवरून (एमएच १० टी ४९४३) शिराळा येथे बाजार आणण्यासाठी गेले होते. शिराळा – बिऊर रस्त्यावरील मोरणा पुलावर अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. यात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर अज्ञात वाहन चालक पळून गेला. या घटनेची वर्दी अतुल अशोक पाटील यांनी शिराळा पोलीस ठाण्यात दिली. मोहन पाटील हे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचे मामे भाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. या घटनेचा अधिक तपास शिराळा पोलीस करत आहेत.