‘मी तुझ्या मुलीबरोबर लग्न करणार होतो. माझे तिच्यावर प्रेम होते. तू तिचे दुसरीकडे लग्न का लावून दिलेस’ म्हणून प्रेयसीच्या आईला काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार तुंग (ता.मिरज) येथे घडला. याप्रकरणी गणेश पाटील व शरद अशोक पाटील (रा. तुंग) या दोघांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तुंग (ता. मिरज) येथील सरिता विलास जाधव (वय ४९, वसंतनगर) यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. त्यांच्या मुलीवर प्रेम करणारा गणेश पाटील व साथीदार शरद पाटील हे दोघे जण रात्री आठच्या सुमारास जाधव यांच्या घरी आले. सरिता आणि त्यांच्या सासू सोनाबाई या दोघी जणी घरी होत्या. गणेश याने सरिता यांना उद्देशून ‘तुम्ही मुलीचे दुसरीकडे लग्न का लावून दिले’ म्हणून वाद घातला. त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु गणेश याने शिवीगाळ करून हातातील काठीने त्यांच्या कंबरेवर, हातावर मारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
सरिता यांच्या सासू सोनाबाई या सोडवण्यास आल्या असताना त्यांनाही काठीने मारले. त्यांच्या हातातील बांगड्या फोडून दुखापत केली. मारहाणीनंतर गणेश व शरद या दोघांनी दोघींना शिवीगाळ करून जाताना सरिता यांचा मुलगा ‘अक्षय याला जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी दिली.
या प्रकारानंतर सरिता यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून दोघांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार घरात घुसून मारहाण, शिवीगाळ, दमदाटीबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.