टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु असताना चॅम्पियन ट्रॉफीसाठी खलबतं सुरु झाली आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार आहे. पण या स्पर्धेच्या आयोजनापूर्वी भारतीय संघाची कोंडी होताना दिसत आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धा संपण्यापूर्वीच आयसीसीची चॅम्पियन ट्रॉफी 2025 साठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. 2024 वर्ष संपण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असून बहुप्रतिक्षित चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या तात्पुरत्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. रिपोर्टनुसार, चॅम्पियन ट्रॉफी पुढील वर्षी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे. या स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानातच होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे या स्पर्धेपूर्वीच भारतीय संघाची कोंडी होताना दिसत आहे. भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही असा प्रश्न आतापासून उपस्थित होत आहे. तात्पुरत्या तारखा समोर आल्या असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तीन स्टेडियम निवडले आहेत. लाहोर, कराची आमि रावळपिंडी येथे ही चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे. भारताचे सर्व सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये आयोजित करणार असल्याचं वृत्त आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताचे सर्व सामने एकाच स्टेडियमवर आयोजित कण्याचा निर्णय घेतला आहे. कारण भारतीय संघाला पुरेशी सुरक्षा पुरवण्यात येईल. पीसीबीने भारतीय खेळाडूंना सर्व प्रकारची सुरक्षा पुरवली जाईल असं आयसीसीला सांगितलं आहे. लाहोर शहर भारतीय सीमेजवळ आहे. त्यामुळे बारतीय चाहत्यांचा प्रवासही सोयिस्कर होईल. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात यावा यासाठी पाकिस्तानने सर्वच स्तरावर तयारी सुरु केली आहे.
भारतीय संघ 2006 पासून पाकिस्तानात गेलेला नाही. पण चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तानाच होणार असल्याने भारताची कोंडी झाली आहे. कारण स्पर्धा इतरत्र हलवण्यासाठी आयसीसीकडे ठोस कारण असणं गरजेचं आहे. बीसीसीआय सुरक्षेचं कारण देत असली तर इतर क्रिकेट मंडळानी त्याची री ओढणं गरजेचं आहे. अलीकडे बांगलादेश, श्रीलंका ,अफगाणिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड या संघांनी पाकिस्तानचा दौरा केला आहे. दुसरीकडे हायब्रीड मॉडेलमध्ये स्पर्धा आयोजिक केल्यास पाकिस्तानला फटका बसू शकतो. कारण भारताचे सामना दुबई किंवा श्रीलंकेत आयोजित करावे लागतील.
आता बीसीसीआय आयसीसीपुढे कसा युक्तिवाद करते. तसेच आशिया चषकाप्रमाणे हायब्रीड मॉडेल अंतर्गत स्पर्धा होणार का? असा प्रश्न आहे. दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सुरक्षेची हमी देऊन स्पर्धेचं आयोजन पूर्णपणे पाकिस्तानाच करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे दोन तीन महिन्यात स्पर्धेबाबत काय ते स्पष्ट होणार आहे.