वैद्यकीय उपचार आणि औषधांच्या खर्चामुळे हैराण झालेल्या कोट्यवधी लोकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आजपासून ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. ज्या औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये मधुमेह, हृदय आणि कानाच्या रोगांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मल्टीव्हिटामिन्स इत्यादींचा समावेश आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
अनेक अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा हा निर्णय नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी च्या (एनपीपीए) १२४ व्या बैठकीत घेण्यात आला होता. दरम्यान, एनपीपीए देशात विकल्या जाणाऱ्या अत्यावश्यक औषधांच्या किमती ठरवते, ज्याचा वापर सामान्य लोक करतात. बैठकीत ५४ औषधं फॉर्म्युलेशन आणि ८ विशेष औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या औषधांच्या किमतींत घट
या बैठकीत एनपीपीएने निश्चित केलेल्या ५४ औषधांच्या किमतींमध्ये मधुमेह, हृदय, प्रतिजैविक, व्हिटॅमिन डी, मल्टी व्हिटॅमिन, कानाची औषधे इत्यादींचा समावेश आहे. या व्यतिरिक्त एनपीपीएने या बैठकीत ८ विशेष फीचरच्या उत्पादनांच्या किमतींवर निर्णय घेतला होता.
गेल्या महिन्यात अनेक जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी झाल्या
गेल्या महिन्यातही सरकारने अनेक जीवनावश्यक औषधांच्याकिमती कमी केल्या होत्या. गेल्या महिन्यात सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ४१ औषधांच्या आणि ६ विशेष औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. अँटीबायोटिक्स, मल्टी व्हिटॅमिन, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित औषधांच्या किमतीही गेल्या महिन्यात कमी करण्यात आल्या होत्या. याशिवाय यकृताची औषधे, गॅस आणि ॲसिडिटीची औषधे, पेन किलर, ॲलर्जीची औषधेही गेल्या महिन्यात स्वस्त करण्यात आली आहेत.
१० कोटींहून अधिक लोकांना लाभ
एनपीपीएच्या या निर्णयाचा फायदा करोडो लोकांना होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. उदाहरणार्थ, सध्या एकट्या देशात १० कोटींहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. हे जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांना नियमित औषधांवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत १० कोटींहून अधिक मधुमेही रुग्णांना कमी झालेल्या किमतीचा थेट फायदा होणार आहे.