महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणात तर पावसाचा अक्षरश: हाहाकार माजला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडत आहे. तसेच रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा कहर पाहता काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुुट्टी जाहीर करण्यात आली.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडत आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दरड कोसळल्याचीदेखील घटना घडली आहे. यामुळे कोकण रेल्वे प्रभावित झाल्याचीदेखील माहिती समोर आली आहे. तसेच रायगड जिल्ह्यातही पावसाचा कहर बघायला मिळतोच. मुसळधार पावसाचा अंदाज पाहता रत्नागिरी जिल्ह्यात सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर आणि माणगाव या तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांना सोमवारी १५ जुलैला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत अधिकृत आदेश दिले आहेत.
आदेशात नेमकं काय म्हटलं आहे?
प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून, संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. ज्याअर्थी, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. संदर्भ क. २ कडील शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार १४ जुलैला रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. वरील सर्व बाबी तसेच तहसीलदार, माणगाव, महाड आणि पोलादपूर यांच्या अहवालाचे अवलोकन करता महाड, पोलादपूर आणि गाणगांव या तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर करणे आवश्यक असल्याचे माझे मत झाले आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटलं आहे.
मला आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व दिनांक ०२/०८/२०१९ च्या शासन परिपत्रकान्वये प्रदान करण्यात आलेल्या, अधिकारान्वये महाड, पोलादपूर आणि माणगांव या तालुक्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी, खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना दिनांक १५ जुलैला सुट्टी जाहीर करीत आहे. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.