आज महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटपावर होणारी चर्चा रद्द करून राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि महिला सुरक्षेवर चर्चा करण्यात आल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तर या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीकडून येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. बदलापूरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून बंदची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. ‘बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत ही गंभीर घटना घडली ती शाळा भाजप आरएसएसशी संबंधीत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला तर या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणी महाभ्रष्ट युती सरकारविरोधात महाविकास आघाडीने 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देत आहे. तरी जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.