केंद्राकडून सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना ‘शालेय सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबतच्या मार्गदर्शक सूचना’ लागू करण्याचे दिले निर्देश
शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालय कटिबद्ध आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2017 ची रिट याचिका (फौजदारी) क्रमांक 136 आणि 2017 ची रिट याचिका (सिव्हिल) क्रमांक 874 वरील निकालादरम्यान दिलेल्या आदेशानुसार शालेय संस्थांची कार्यपद्धती आणि उत्तरदायित्व अधिक बळकट करून विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, शिक्षण मंत्रालयाने ‘शालेय सुरक्षा आणि सुरक्षितताबाबत मार्गदर्शक सूचना-2021’ विकसित केल्या आहेत, ज्या पोक्सो (POCSO),म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांना संरक्षण देणाऱ्या कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून आहेत.
या मार्गदर्शक सूचनांमध्ये इतर तरतूदींबरोबरच सरकारी, सरकारी अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबत शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करणाऱ्या तरतुदी आहेत. त्याशिवाय, या मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रतिबंधात्मक प्रशिक्षण, विविध भागधारकांची जबाबदारी, अहवाल देण्याची प्रक्रिया, संबंधित कायदेशीर तरतुदी, सहाय्य आणि समुपदेशन आणि सुरक्षित वातावरण यासाठी उपाय देण्यात आले आहेत. या मार्गदर्शक सूचना सुलभता, समावेशकता आणि सकारात्मक शिक्षण प्रक्रियेसाठी महत्वाच्या आहेत.
या मार्गदर्शक सूचना 01.10.2021 रोजी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेश/शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या (DoSEL) आणि मंत्रालयाच्या भागधारक स्वायत्त संस्थांना वितरित करण्यात आल्या होत्या. या मार्गदर्शक सूचना प्रामुख्याने विविध भागधारक आणि विभागांना शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेप्रति असलेले त्यांचे उत्तरदायित्व सांगतात आणि त्याचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करतात. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सूचित करण्यात आले होते की ते राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या विशिष्ट गरजांनुसार या मार्गदर्शक सूचनांमध्ये भर घालू शकतील/बदल करू शकतील आणि या मार्गदर्शक सूचना अधिसूचित करू शकतील. या मार्गदर्शक सूचना DoSEL च्या पुढील वेबसाइटवर अपलोड केल्या आहेत: https://dsel.education.gov.in/sites/default/files/2021-10/guidelines_sss.pdf.