क्रिप्टो करंसी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून गुंतवणुक दुपटीचे आमिष दाखवत डॉ. अनिल नथ्थू शिंदे (वय ७०, रा. अमळनेर) यांना सायबर गुन्हेगारांनी तब्बल १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपयांचा गंडा घातला आहे.
नफ्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचा पैसाही गेला, नफाही आला नाही म्हणून डॉक्टरांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी झासी प्रवीण पाटील नामक महिलेसह तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुकवर आलेली ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ स्वीकारल्यानंतर हा सर्व प्रकार घडला.
ख्यातनाम वैद्यकीय फाउंडेशनचे डॉक्टर असलेले अनिल शिंदे यांना २९ जानेवारीला झासी पाटील नावाच्या महिलेची फेसबुकवर ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली. त्यांनी ती स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये साधारण बोलणे सुरू झाले. या महिलेने (हा प्रकार २९ जानेवारी ते १९ फेब्रुवारी) या काळात एका इंटरनॅशनल ट्रेडिंगबद्दल माहिती दिली. त्यानंतर (ता. ९) महिलेने डॉक्टरांशी संपर्क साधून क्रिप्टो करंसी ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूकविषयी माहिती देत मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखविले. तसेच गुंतवणुकीसाठी लिंक पाठविली व त्याद्वारे ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले.
डॉ. अनिल शिंदे यांनी सुरुवातीला ऑनलाइन ७० हजार रुपये पाठवून गुंतवणूक केली. त्यावर त्यांना १ लाख ५३ हजार २१ रुपये नफा झाल्याचे दाखविण्यात आले. यातून विश्वास संपादन करण्यात आला व डॉ. शिंदे यांच्याकडून वेळोवेळी एकूण १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपये स्वीकारले.
आभासी नफा दाखवून गंडा
डॉक्टरांनी केलेल्या एकूण १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपयांच्या गुंतवणुकीतून ३ कोटी ९१ लाख ८७ हजार ७६६ रुपये नफा झाल्याचे त्यांना दिसत होते. ती रक्कम काढण्याविषयी त्यांनी सांगितले असता त्यासाठी कंपनीची २० टक्के व्हेरिफिकेशन फी म्हणून ६५ लाख ३१ हजार २९४ रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. मात्र आता पैसे नसल्याचे डॉक्टरांनी सांगत भरलेले पैसे परत मिळण्याची विनंती केली. मात्र उडवाउडवीचे उत्तरे देत पैसे देण्यास नकार देण्यात आला. याप्रकरणी डॉ. अनिल शिंदे यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.






