केंद्र शासनाने भरडधान्य योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांकडून हमीभावाने ज्वारीची खरेदी केली आहे. त्यामुळे खरेदी केलेली ज्वारी नागरिकांना रेशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
गव्हासोबत ज्वारीचे देखील वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. सप्टेंबर महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानातून ज्वारीचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना पोळीसोबत ज्वारीची देखील चव चाखायला मिळणार आहे.
केंद्र शासनातर्फे तृणधान्य वर्ष राबविण्यात येत असून, ज्वारी ही आरोग्यासाठी पौष्टिक असे तृणधान्य आहे. दरवर्षी राज्यासह देशभरात मोठ्या प्रमाणावर धान्याचे उत्पादन घेतले जाते. यंदा सरकारतर्फे शेतकऱ्यांचे हे धान्य हमीभावाने खरेदी करून, हे धान्य रेशन दुकानातून वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षांपासून अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंब योजनेअंतर्गत शिधापत्रिकांवर गहू आणि तांदळाचे वितरण करण्यात येते.
तसेच आता सण, उत्सवाच्या काळात आनंदाचा शिधाही वाटप करण्यात येत आहे. मागील वर्षापासून शिधापत्रिकांवरील गव्हाच्या वितरणाचे प्रमाण कमी करून, तांदळाचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. मात्र, आता पात्र लाभार्थ्यांना ज्वारी देखील मिळणार असून, याचा साठा पुरवठा विभागाकडे उपलब्ध झाला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली.
कोणत्या गटाला किती धान्य मिळते?
अंत्योदय या कार्डधारकांना दरमहा ३५ किलो धान्य मिळते. त्यांना तांदळासाठी प्रतिकिलो ३ रुपये, तर गव्हासाठी दोन रुपये अनुदानित दराने धान्य मिळते. प्राधान्य गट : दरमहा प्रतिव्यक्त्ती ५ किलो धान्य मिळते. या कार्डधारकांना ३ रुपये किलो तांदूळ, दोन रुपये किलो गहू आणि एक रुपये किलो सवलतीच्या दरात धान्य मिळते.
गव्हासोबत ज्वारीदेखील मिळणार
धुळे जिल्ह्यात प्राधान्य गट कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या ९५ हजार ८०२ इतकी आहे. या लाभार्थ्यांना दरमहा प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मिळते. केंद्र शासनाने यंदा भरडधान्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली आहे. त्यामुळे यंदा रेशन दुकानात गव्हासोबत ज्यारीदेखील मिळणार आहे. दैनंदिन आहारात कडधान्यांचा वापर व्हावा आणि आरोग्यासाठी पौष्टिकता लाभावी, यादृष्टीने रेशनकार्डधारकांसाठी दिवाळीपर्यंत ज्वारी देण्यात येणार आहे.
शासनाने शेतकरी बांधवांकडून यंदा हमीभाव योजनेअंतर्गत ज्वारीची खरेदी केली असून, गव्हासोबत लाभार्थ्यांना ज्वारीचेही वाटप केले जाणार आहे. मात्र, रेशनमध्ये गहू मिळणारच आहे. गहू बंदकरण्यात आलेला नाही. तसेच ज्वारीही आरोग्यासाठी पौष्टिक असल्यामुळे, यानिमित्ताने आहारात कडधान्याचाही वापर वाढण्यास मदत होणार आहे. – महेश शेलार, जिल्हा पुरवठा अधिकारी, धुळे.