इंडियन प्रीमिअर लीग २०२५ पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. प्रत्येक फ्रँचायझींना त्यांच्या सध्याच्या संघातील किमान ६ खेळाडू रिटेन ठेवण्याची मुभा BCCI देऊ शकते.
याबाबतची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. पण, या सहा खेळाडूंमध्ये नेमकं कोणाला कायम ठेवायचं, या प्रश्नाने फ्रँचायझींची डोकेदुखी वाढली आहे. अशात ऑक्शनपूर्वी पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याला Kolkata Knight Riders ने कर्णधारपदाची ऑफर दिल्याचे वृत्त समोर आले होते. त्यावर Mumbai Indians ने मोठे अपडेट्स दिले आहेत…
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियातही बदलाचे वारे वाहताना दिसले. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून निवृत्ती जाहीर केल्यानंतर कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे जाईल अशी दाट शक्यता होती. पण, निवड समितीने सूर्यकुमारला कॅप्टन केले… आता आयपीएल २०२५ मध्ये टीम इंडियाचा कर्णधार हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळणार का? हा प्रश्न उद्भवला आहे. रोहित शर्मा नाराज असल्याची चर्चा आहे आणि रोहित व सूर्या मुंबई इंडियन्सची साथ सोडणार, असा अंदाज आहे. अशात सूर्यकुमारला KKR ने कर्णधारपदाची ऑफर दिल्याची चर्चा आहे.
मुंबई इंडियन्स काय म्हणते?
सूर्यकुमार यादव आयपीएल २०२५ तही मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे, असे MI ने स्पष्ट केले. स्पोर्ट्स तकने दिलेल्या वृत्तानुसार सूर्या कुठेही जात नाही, असे मुंबई इंडियन्सच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. या सोशल मीडियावरील चर्चा आहेत, असेही त्यांनी सांगितले. ”तो कुठेही जातत नाही. या लोकांनी सोशल मीडियावरील त्यांचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी सुरू केलेल्या चर्चा आहेत,”असे सूत्राने स्पोर्ट्स तकला सांगितले.
एकच वादा, सूर्या दादा…
सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये १५० सामन्यांत ३२.३८च्या सरासरीने ३५९४ धावा केल्या आहेत. त्यात २ शतकं व २४ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलच्या मागील पर्वात त्याने ११ सामन्यांत १ शतक व ३ अर्धशतकांसह ३४५ धावा केल्या होत्या.