अखेर सर्व चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली असून संग्राम चौगुलेने घरात वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून एन्ट्री घेतली आहे.
‘बिग बॉस’च्या घरात यंदा पहिल्या दिवसापासून दोन गट पडले होते. ‘टीम ए’मध्ये अरबाज, निक्की, वैभव, जान्हवी असे सदस्य होते. मात्र, कालांतराने यांच्या मैत्रीत फूट पडली. मैत्री जरी तुटली असली, तरी अरबाज आणि वैभव हे दोघं पूर्णपणे ‘टीम बी’ कडून खेळत नाहीत. अरबाज निक्कीला सपोर्ट करतोय, तर वैभव जान्हवीला सपोर्ट करत आहे. टास्कमध्ये अनेकदा बळाचा वापर करावा लागतो आणि अशावेळी ‘टीम बी’चे सदस्य अरबाज-वैभवच्या ताकदीपुढे कमी पडतात असे आरोप देखील नेटकऱ्यांकडून करण्यात येत होते. अखेर संग्राम चौगुले हा रांगडा गडी या खेळात वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून आला आहे. आता संग्रामला आपल्या बाजूने करण्याचा ‘बी टीम’चा पूर्ण प्रयत्न असेल मात्र, संग्राम कोणत्या टीमची साथ घेऊन पुढचा प्रवास करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
Bigg Boss Marathi : संग्राम चौगुले आहे तरी कोण?
संग्राम चौगुले हा कोल्हापूरचा आहे. लोकप्रिय बॉडीबिल्डर म्हणून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. संग्राम अतिशय फिटनेस फ्रिक आहे. २०१२ मध्ये त्याने ८५ किलो वजनी गटात मिस्टर युनिव्हर्सचं विजेतेपद पटकावलं होतं. तर, २०१४ मध्ये संग्रामने मिस्टर वर्ल्ड स्पर्धा जिंकली होती. त्याने एकूण सहा वेळा मिस्टर इंडिया आणि पाच वेळा मिस्टर महाराष्ट्र हा किताब पटकावला आहे. संग्रामच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचं झालं तर, तो इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहे.
‘आपल्या सगळ्यांच्या घरात श्रींच आगमन झालं आहे. पण, आता ‘बिग बॉस’च्या घरात एक वेगळे ‘श्री’ जाणार आहेत. ते केवळ मुंबई श्री, महाराष्ट्र श्री किंवा एशिया श्री नाहीयेत. या सगळ्याबरोबरच ते ‘मिस्टर वर्ल्ड’ श्री आणि ‘मिस्टर युनिव्हर्स’ श्री सुद्धा राहिलेले आहेत. लाल मातीतले ते रांगडे गडी आहेत. त्यांच्या मनगटात ताकद आहे आणि बोलण्यात वजन, वागण्यात कोल्हापुरी बाणा आहे. ते बलवान आहेत आणि आपल्या महाराष्ट्राची शान आहेत. असे हे संग्राम चौगुले घरात एन्ट्री घेणार आहेत’ रितेश देशमुखने या वाइल्ड कार्ड संग्रामची ओळख अशाप्रकारे करून दिली.