रितेशला घरात येऊन एका सदस्याला एलिमिनेट करणं काहीसं कठीण गेलं. गेल्या आठवड्यात अभिजीत, अंकिता, वैभव, निक्की, वर्षा आणि आर्या असे सहा सदस्य नॉमिनेट होते. यापैकी आर्याला निक्कीला कानशिलात लगावल्याप्रकरणी ‘बिग बॉस’ने घराबाहेरचा रस्ता दाखवला. तर, उर्वरित पाच जणांपैकी वैभवने घराचा निरोप घेतला आहे.
नॉमिनेट असलेल्या पाच जणांपैकी सर्वात आधी रितेश देशमुखने अभिजीतला सेफ केलं. यानंतर अभिनेत्याने वर्षा उसगांवकरांना सेफ केलं. पुढे, रितेशने बॉटम ३ मध्ये अंकिता, वैभव आणि निक्की हे सदस्य असल्याचं सांगितलं. या तिघांमध्ये शेवटी निक्की आणि अंकिताला सेफ करून रितेशने वैभव Eliminate झाल्याचं जाहीर केलं.
रितेशने वैभवचं नाव जाहीर करताच जान्हवी आणि अरबाज दोघेही प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. घरातून निरोप घेण्याआधी वैभवचे दोन्ही मित्र त्याला मिठी मारून ढसाढसा रडत होते. यानंतर रितेश देशमुखसह वैभवने घरातून एक्झिट घेतली.
‘बिग बॉस’च्या मंचावर येताच रितेशने वैभवला त्याचा आतापर्यंतचा प्रवास दाखवला. यानंतर सर्वांनी टीव्हीवर वैभवची भेट घेतली. घरातून निरोप घेताना प्रत्येक सदस्याला त्याच्या म्युच्युअल फंड्समध्ये असणारे कॉइन्स घरातील दुसऱ्या कोणत्यातरी सदस्याला द्यावे लागतात. यापूर्वी छोटा पुढारीने त्याचा कॉइन सूरजला दिला होता. तर, योगिताने आर्याला तिच्या कॉइन्सचं वारसदार केलं होतं. आता वैभवला मात्र दोन जणांची निवड करण्याची संधी देण्यात आली होती. यामुळे वैभवने अरबाज आणि जान्हवीला त्याचे कॉइन्स वाटून देत त्यांची खेळातील पॉवर वाढवली.






