इचलकरंजी
इचलकरंजी फेस्टिव्हलचे विशेष आकर्षण बनलेल्या भव्य दिव्य शरीरसौष्ठव स्पर्धेत कोल्हापूरच्या वैभव चव्हाण यांनी ‘पश्चिम महाराष्ट्र श्री’ आणि ‘इचलकरंजी टॉप टेन’ असा दुहेरी किताब पटकविला. तर पुण्याचा मनिष कांबळे हा पश्चिम महाराष्ट्र श्री चा उपविजेता आणि कोल्हापूरचा अक्षय सोनुले हा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. विजेत्यास पश्चिम महाराष्ट्र श्री किताब, 25 हजार रुपये व सन्मानचिन्ह तर प्रथम उपविजेत्यास 10 हजार रुपये व सन्मानचिन्ह व दुसर्या उपविजेत्यास 5 हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पारितोषिक देण्यात आले.
इचलकरंजी फेस्टिव्हल अंतर्गत दरवर्षी भव्य अशा शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी इचलकरंजी मर्यादीत अशा स्वरुपात ही स्पर्धा घेण्यात येत होती. यंदा प्रथमच ही स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रातील स्पर्धकांसाठी घेण्यात आली. एकूण सात गटात झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, पुणे आदी जिल्ह्यातून जवळपास 400 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे, पोलिस निरिक्षक सचिन पाटील, फेस्टिव्हलच्या संयोजिका सौ. मौश्मी आवाडे यांच्या हस्ते श्रीं ची महाआरती व दीपप्रज्वलन करुन करण्यात आला. स्वागत फेस्टिव्हलचे कार्याध्यक्ष अहमद मुजावर यांनी केले. यावेळी डॉ. राहुल आवाडे यांनी आजवरच्या फेस्टिव्हलच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे यांनी, तरुणांनी व्यसनांच्या आहारी न जाता आपले मन, शरीर त्याचबरोबर समाज सदृढ करण्याच्या दृष्टीने खेळांकडे वळावे, असे आवाहन केले. सर्वच विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सूत्रसंचालन फेस्टिव्हलचे सचिव चंद्रशेखर शहा यांनी केले. आभार शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त भारत श्री अजिंक्य रेडेकर यांनी मानले.
इचलकरंजी टॉप टेन गटात वैभव चव्हाण, धनराज कुंभार, प्रथमेश नेमिष्टे, कातिक पराळ, अक्षय सोनुले, प्रतिक पाटील, आकाश राणे, संज्योत ढवळे, द्वितेश धनवडे, वेदांत पोळ यांनी यश प्राप्त केले. तर 50 ते 55 किलो गटात अनुक्रमे प्रमोद सुर्यवंशी (सांगली), अविनाश नायडु (पुणे), रितेश फटफटवाले (सोलापूर), प्रथमेश पाटील (कोल्हापूर) व शानुर तांबोळी (कोल्हापूर). 55 ते 60 किलो गटात संज्योत ढवळे (कोल्हापूर), उमर शिरगांवे (कोल्हापूर), विश्वजित देशमुख (सातारा), वेदांत पोळ व प्रणय चोरगे (रत्नागिरी). 60 ते 65 किलो गटात वैभव चव्हाण, धनराज कुंभार, प्रथमेश नेमिष्टे, कार्तिक पराळ व प्रतिक पाटील (सर्व कोल्हापूर). 65 ते 70 किलो गटात राज घाडगे (सांगली), पुरुषोत्तम इरनक (सांगली), प्रशांत मोरे (कोल्हापूर), ऋषिकेश पाटील (कोल्हापूर) व ओंकार गर) (सोलापूर). 70 ते 75 किलो गटात अक्षय सोनुले (कोल्हापूर), अक्षय दिडवाघ (सातारा), ओंकार भोई (कोल्हापूर), द्वितेश धनवडे (कोल्हापूर) व राहुल यादव (सांगली). 75 ते 80 किलो गटात मनिष कांबळे (पुणे), आलम शिकलगार (कोल्हापूर), अभिजित पाडळे (कराड), तन्वीर सय्यद (सातारा) व सिध्दार्थ कुरणे (कोल्हापूर) यांनी यश प्राप्त केले. यावेळी पंच म्हणून राजेश वडाम, राजेंद्र हेंद्रे, दिपक माने, मुरली वत्स, संदीप यादव, शेखर खरमाडे, दिपक खाडे, कैलास शिपेकर, ओम सातपुते, सचिन कुलकर्णी, धनंजय चौगुले आदींनी काम पाहिले.
याप्रसंगी चंद्रकांत पाटील, सुभाष जाधव, चंद्रकांत इंगवले, नरसिंह पारीक, भारत बोंगार्डे, राजू पुजारी, मोहन काळे, प्रदीप दरीबे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, खेळाडू, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.