जिल्हा पुरवठा विभागातर्फे गॅस कंपन्यांकडून महिलांच्या नावे नोंदणीबाबत यादी मागविण्यात आली. त्या याद्या प्राप्त झाल्या असून, तपासणी सुरू आहे. रिपीट नावे किंवा अन्य तांत्रिक दोष दूर सारत याद्या अंतिम केल्यावर अनुदानाबाबत शासनाकडे शिफारस केली जाईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली
जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत एक लाख ४३ हजारांवर महिला लाभार्थी आहेत. या लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे. महिलांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०१६ मध्ये सुरू झाली.
…अशा आहेत अटी-शर्ती
या पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्ह्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांना दिलासा देणारी ठरेल, या उद्देशाने सरकारने उचित कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी लाभार्थी महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी. त्यांच्या कुटुंबात घटकसंख्या पाच असावी. कुटुंबाकडे १४.२ किलो एलपीजी गॅस सिलिंडर जोडणी आवश्यक आहे. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत संबंधित महिला पात्र असणे गरजेचे आहे. मोफत गॅस सिलिंडर लाभासाठी या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
गॅस एजन्सीशी संपर्क
योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी महिलांनी त्यांच्या जोडणीतील गॅस एजन्सीशी संपर्क साधून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या महिला उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असतील, त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र असलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेंतर्गत महिलांना प्रथम स्वखर्चातून गॅस सिलिंडर विकत घ्यावा लागणार आहे. नंतर महिलांच्या खात्यात खर्चाचे अनुदान जमा केले जाईल
त्यामुळे महिलांना गॅस सिलिंडर खरेदीत होणारा अतिरिक्त खर्च टाळता येणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गरजू कुटुंबांना मदत करणे आणि त्यांचा आर्थिक बोजा कमी करणे हा आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल, असा शासनाचा हेतू आहे. पात्र लाभार्थ्यांना दर वर्षी तीन मोफत सिलिंडर दिले जातील. त्यासाठी ८३० रुपये प्रतिसिलिंडर अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा केले जाईल.
तालुकानिहाय ‘उज्ज्वला’चे लाभार्थी
तालुका……………गॅसधारक
शिरपूर……………४९,६५२
साक्री…………….३७,९४७
धुळे………………३७,३३२
शिंदखेडा………….१८,३४०
एकूण…………….१,४३,२७१
लाडक्या बहिणींनाही देणार लाभ
वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडरमध्ये लाडकी बहीण योजनेची भर पडणार आहे. लाडक्या बहिणींनाही या योजनेचा डेटा अंतिम झाल्यानंतर वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मुख्य कार्यालयात याकामी डेटा संकलन सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी प्रतिकुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. मात्र, योजनेसाठी नमूद अटींनुसार महिलांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असेल. याशिवाय एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलिंडर मिळणार नाही, अशीदेखील अट योजनेत नमूद आहे.
लाभार्थिसंख्या अद्याप अप्राप्त
लाडक्या बहिणीच्या नावेही गॅसजोडणी असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसे नसल्यास महिलांच्या नावे गॅसजोडणी कार्ड करून घ्यावे लागेल. या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना लवकरच दिला जाणार आहे. असे असूनही सिलिंडर घेताना पैसे मोजल्याशिवाय सिलिंडर मिळत नसल्याने गृहिणींमध्ये संभ्रम आहे.
मोफत सिलिंडरची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे ग्राहकांना अजून तरी मोफतच्या प्रतीक्षेतच राहावे लागणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात उज्ज्वला गॅसधारकांची संख्या एक लाख ४३ हजार २७१ आहे. लाडकी बहीण योजना आणि उज्ज्वला योजनेच्या एकूण लाभार्थ्यांची संख्या मंत्रालयातून अद्याप निश्चित झालेली नसल्याचे जिल्हा पुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.