रुग्णालयात गेलेल्या रुग्णांचा डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर कमालीचा विश्वास असतो. परंतु कधी कधी विश्वास उडावा असा प्रकार घडतो. नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. या रुग्णालयात दाखल झालेल्या गर्भवती महिलेस मुलगा झाला. परंतु रुग्णालयातून डिस्चार्ज देताना त्या महिलेस मुलगी देण्यात आली. या प्रकारामुळे संबंधित महिला आणि तिचे नातेवाईक आवक झाले. त्यांनी ते अपत्य घेण्यास नकार दिला. या प्रकारानंतर रुग्णालयातील प्रशासनास महिलेचे नातेवाईक आणि प्रहार संघटनेने धारेवर धरले आहे.
असा घडला प्रकार
चित्रपटांमधील मुलांची आदलाबदलीचे कथानक दाखवले जाते. त्या कथानकाप्रमाणे प्रकार नाशिक जिल्हा रुग्णालयात घडला. नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात एका गर्भवती महिलेने मुलाला जन्माला दिला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या रजिस्टरमध्ये देखील मुलगा म्हणून नोंद करण्यात आली. परंतु त्या महिलेस जेव्हा डिस्चार्ज देण्याची वेळ आली तेव्हा तिच्या हातात मुलगा ऐवजी मुलगी देण्यात आली. मुलाऐवजी हातात मुलगी दिल्यानंतर त्या महिलेचे सर्वच नातेवाईक अवाक झाले. त्या महिलेच्या नातेवाईकांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला.
जिल्हा रुग्णालयातील या प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी अपत्य घेण्यास नकार दिला. त्यानंतर रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी आणि नातेवाईक यांच्यात चर्चा सुरू झाली. परंतु त्या चर्चेतून तोडगा निघाला नाही. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित महिलेने आणि तिच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले आहे. दरम्यान हे प्रकरण अजून पोलिसांपर्यंत गेले नाही.
मागील वर्षी मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये मुलांची अदलाबदल झाली होती. वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या प्रकरणानंतर पाच महिन्यांनंतर पोलिसांनी अज्ञात डॉक्टर्स आणि नर्सेसविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात डीएनए चाचणी करण्यात आली होती. ती निगेटीव्ह आल्यानंतर बाळ बदल्याचा प्रकारावर शिक्कामोर्तब झाले होते.