ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवसही यजमानांच्या नावावर राहिला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात टीम इंडियाच्या 180 धावांच्या प्रत्युत्तरात 337 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने यासह 157 धावांची निर्णायक आघाडी घेतली. भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 विकेट्स गमावून 128 धावा केल्या आहेत. टीम इंडिया आणखी 29 धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज आणि टीम इंडियाला कायम नडणारा ट्रेव्हिस हेड याने दुसरा दिवस गाजवला. हेडने शतकी खेळी करत टीम इंडियाला सामन्यापासून दूर ढकललं आणि ऑस्ट्रेलियाला ड्रायव्हिंग सीटवर आणण्यात मोठी भूमिका बजावली.
हेडने पहिल्या डावात 141 बॉलमध्ये 17 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 140 धावांची खेळी केली. हेडचं हे कसोटी कारकीर्दीतील 8 वं शतक ठरलं. मोहम्मद सिराज याने ट्रेव्हिस हेड याला क्लिन बोल्ड करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. सिराजने हेडला बोल्ड केल्यानंतर एकच जल्लोष केला तसेच हातवारे करत चल निघ असा इशारा केला. हेडनेही यावर प्रत्युत्तर देताना काहीतरी म्हटलं. हेडने सिराजला नक्की काय म्हटलं होतं? याबाबत स्वत: फलंदाजानेच सांगितलं आहे. तसेच हेडने या खेळीबाबतही प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हेडने सिराजला काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.
हेड काय म्हणाला?
“निश्चितच धावा करणं चांगलं राहिलं. गेल्या काही आठवड्यांपासून चांगली बॅटिंग होतेय. मी जोखिम पत्कारली. टीम इंडियाने चांगली बॉलिंग केली. ही खेळपट्टी बॅटिंगसाठी आव्हानात्मक होती”, असं हेडने नमूद केलं.
“काही गोष्टी माझ्या बाजूने घडल्या तर प्रतिस्पर्धी संघावर वरचढ होऊ शकतो. दोन्ही संघ एकमेकांवर वरचढ होण्याच्या हिशोबानेच मैदानात उतरले होते. आम्ही भारतावर वरचढ ठरलो, असं मी म्हणत नाही, मात्र आम्ही चांगल्या स्थितीत आहोत”, असं हेडने नमूद केलं.
“टीम इंडियाकडे अव्वल दर्जाचे गोलंदाज आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात जोखीम घ्यायची होती. फिल्डर जेव्हा जवळ होते तेव्हा मी फटकेबाजी करण्याचं ठरवलं. त्याचा फायदा झाला आणि मी काही वेळ चांगली बॅटिंग केली”,असं हेडने म्हटलं.
त्यानंतर हेड मुद्द्यावर आला. सिराजने हेडला बोल्ड केल्यानंतर डिवचलं. हेडने सिराजच्या एक्शनला रिएक्शन दिली. दोघांचा व्हीडिओ व्हायरल झाला. मात्र दोघांनी एकमेकांना काय म्हटलं? हे क्रिकेट चाहत्यांना समजलं नाही. मात्र हेडने सिराजला काय म्हटलं? हे त्याने स्वत:नेच सांगितलं. “मी सिराजला वेल बॉल, असं म्हटलं. मात्र सिराजने ते दुसऱ्या अर्थाने घेतलं. जे काही झालं, त्यामुळे मी निराश आहे. मात्र जे झालं ते सर्वांसमोर आहे. जर त्याला स्वत:ची प्रतिमा अशीच ठेवायची असेल, तर ठीक आहे, असंच होऊ देत”, असं म्हणत हेडने अप्रत्यक्ष इशाराच दिला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.