बिग बॉस (Bigg Boss Marathi 5) फेम मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर ( Ankita Walawalkar) नेहची आपल्या रिल्स आणि व्लॉग्समुळे चर्चेत असते. आता अशाच आणखी एका व्हिडीओमुळे अंकिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकिता वालावलकरनं एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. याची माहिती तिनं स्वतः सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत दिली आहे. ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेसाठी तिनं गाणं लिहिलं आहे. तसेच, या गाण्याची झलक अंकितानं तिच्या व्हिडीओमधून दाखवली आहे.
अंकिता वालावलकर म्हणजेच, ‘कोकण हार्टेड गर्ल’नं स्वतः ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेसाठी लिहिलेलं गाणं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत चाहत्यांना ऐकवलं आहे. 23 डिसेंबरपासून ‘झी मराठी’वर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे, या मालिकेचं शीर्षक गीत अंकितानं लिहिलं आहे. हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांच्या मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेसाठी अंकितानं शीर्षक गीत लिहिलं आहे. या कौटुंबिक मालिकेची प्रेक्षक गेल्या काही महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. याच बहुचर्चित मालिकेसाठी अंकिताला प्रोमो गीत लिहिण्याची संधी मिळाली याचा आनंद असल्याचंही अंकिता व्हिडीओमध्ये म्हणाली. अंकिताच्या या पहिल्याच गाण्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
व्हिडीओमध्ये अंकिता म्हणाली की, “झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका तुमच्या भेटीला येतेय. या मालिकेचं नाव आहे लक्ष्मी निवास. यासाठी मी गाणं लिहिलंय… मी लिहिलेलं हे पहिलं गाणं हर्षवर्धन वावरे याने गायलं आहे आणि कुणाल-करण यांनी हे गाणं कंपोझ केलंय. लहानपणापासून मला गाण्याची आवड होती आणि या प्रोमोच्या निमित्ताने मी याची सुरुवात केलेली आहे.”
‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरनं लिहिलेल्या शीर्षक गीताच्या काही ओळी
स्वप्न सारे पाहिले
घर आनंदाचे
आधार नात्यांना भासतो
दुःख भारी वाटते
स्वप्न थोडे अडखळते
वेळ संयमाची वाटते
घर हे दिसती चार भिंती जणू
पण ही भावनांची कुस वीणू
सावरु
स्वप्न पुन्हा पाहण्या
सुखाची या
गोष्ट पुन्हा लिहिण्या
बंध ते जे सुख बोलती
मखमली स्वप्नांचे लक्ष्मी निवास ते
दरम्यान, बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर झळकली होती. या सीझनची अंतिम फेरी अंकितानं गाठली होती. या पर्वाचा विजेता बारामतीचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण ठरला होता. बिग बॉसमुळे अंकिता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.