देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी रात्री अचानक गर्दी उसळली. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला. या घटनेतून दिल्लीकर सावरत नाही तेच आज पहाटे दिल्लीत भूकंपाची घटना घडली. नवी दिल्ली आणि एनसीआर परिसराला आज पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के बसले. सोमवारी पहाटे 5 वाजून 36 मिनिटांनी नवी दिल्लीत भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिक्टर स्केल इतकी होती. यामुळे दिल्लीत जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भूकंपाच्या धक्क्यानंतर दिल्ली रेल्वे स्थानकावर कशी स्थिती होती, याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली स्टेशनवर काय स्थिती होती?
नवी दिल्लीत झालेल्या भूकंपानंतर दिल्ली रेल्वे स्थानकावर काय स्थिती होती, याची माहिती समोर आली आहे. एका रेल्वे प्रवाशाने एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं याची माहिती दिली. मी माझ्या ट्रेनची वाट पाहत बसलो होतो. अचानक जमीन जोरजोरात हादरू लागली. वेटींग रुममध्ये जे कोणी बसले होते ते सर्वजण इकडे तिकडे सैरावैरा पळू लागले. काहींना पूल किंवा काहीतरी जड वस्तू कोसळल्यासारखे वाटले. पण काही वेळाने पूल वैगरे काही पडलेला नाही हे समजले आणि भूकंप आल्याची माहिती मिळाली. खूप जोरदार आवाजही आला. साधारण ५ ते १० सेकंद हे धक्के बसले, असे तो प्रवासी म्हणाला.
संपूर्ण इमारत हादरली
तर गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने भूकंपाबद्दल प्रतिक्रिया दिली. गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही राहत असलेली संपूर्ण इमारत हादरत होती. यापूर्वी असे कधीही झाले नव्हते. आम्हाला आमचे घर कोसळेल की काय असे वाटत होते. अनेकजण ताबडतोब बाहेर पडा”, असे सांगत होता. परिसरात खूप घबराट उडाली होती.
खूप वेगाने ट्रेन आल्यासारखे वाटले
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर वाट पाहणाऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, या भूकंपाचा धक्का थोडा वेळच राहिला, पण त्याची तीव्रता खूप जास्त होती. आम्हाला प्लॅटफॉर्मवर खूप वेगाने ट्रेन आल्यासारखे वाटत होते, असे तो म्हणाला.
दरम्यान दिल्लीत अचानक झालेल्या या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पहाटे साखरझोपेत असताना अचानक जमीन हलत असल्याचे जाणवण्यास सुरुवात झाली. यानंतर दिल्लीकरांनी खबरदारी म्हणून तात्काळ घराबाहेर पडण्यास सुरुवात केली. दिल्ली-एनसीआरसह शेजारील राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने या भूकंपामुळे कुठेही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.