प्रसिद्ध मराठी प्रवासवर्णनकार, कादंबरीकार आणि कवयित्री डॉ. मीना प्रभू यांचे निधन झाले आहे. त्या 85 वर्षांच्या होत्या आणि गेल्या काही काळापासून आजारी होत्या. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. प्रवास वर्णनकार म्हणून त्यांची पुस्तके प्रसिध्द होती. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डॉ. मीना प्रभू या मूळच्या पुण्याच्या होत्या, पण विवाहानंतर लंडनमध्ये स्थायिक झाल्या होत्या. पेशाने भुलतज्ञ असलेल्या प्रभू यांनी आपल्या लेखनाने प्रवासवर्णनाला एक वेगळेच वलय प्राप्त करून दिले होते.
प्रवास वर्णनकार म्हणून त्या प्रसिध्द होत्या. त्यांचे पहिले प्रवासवर्णनपर पुस्तक ‘माझं लंडन’ होते. मीना प्रभूंनी 12 पेक्षा अधिक प्रवासवर्णने लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी जगातील निरनिराळ्या ठिकाणांची ज्ञान देणारी व रंजन अशी माहिती दिली होती. त्यांची ‘माझं लंडन’, ‘इजिप्तायन,’ ‘तुर्कनामा,’ ‘ग्रीकांजली,’ ‘चिनी माती’ अशी अनेक पुस्तके लोकप्रिय झाली.
मीना प्रभू यांनी जगातल्या अनेक देशांमध्ये प्रवास केला आहे, त्याची प्रवासवर्णने लिहिली. त्यावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे प्रवासवर्णनांवरील लेख विविध वृत्तपत्रे, मासिके यामध्ये प्रकाशित झाले होते.
मीना प्रभू यांनी गोव्यातील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले आहे. तसेच मीना प्रभू यांना दि. बा. मोकाशी पारितोषिक-2010, गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार-2011, न. चिं. केळकर पुरस्कार-2012, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळाले. त्यांनी पुण्यात 2017 मध्ये ‘प्रभू ज्ञानमंदिर’ हा अत्याधुनिक किंडल लायब्ररीचा प्रकल्प सुरू केला होता.