मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो, व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यात एकच संतापाची लाट उसळली आहे. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आल्याचा आरोप होता. गृहखात्याकडे सर्व फोटो, व्हिडिओ असतानाही आरोपी वाल्मिक कराड याला व्हिआयपी ट्रीटमेंट देण्यात येत आली. मुद्दामहून सीसीटीव्ही बंद ठेवण्यात आल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया दिली. एक फोटो पाहून त्यांच्या मनातील घालमेल समोर आली. त्यांचा असंतोष समोर आला. या आरोपींना गोळ्या घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. काय म्हणाले धनंजय देशमुख?
मी निःशब्ध
मी तर एकच फोटो पाहायला आणि असे सांगताना धनंजय देशमुख यांनी आंवढा गिळला. ते म्हणाले की मला संतोष देशमुख यांच्यासोबतचे लहानपणीचे दिवस आठवले. फोटो, व्हिडिओ बघून मी निःशब्द झालो. त्यांचा शेवटचा दिवस आठवला. हे सहन नाही होऊ शकत. रात्री गावकरी आले होते. जो येईल, त्याच्या गळ्यात पडून रडावं वाटत होतं.
नियती त्यांना कधीच माफ नाही करणार
आता काय करावं ते समजत नाही. माझा चार वर्षांचा मुलगा म्हणतो की, संतोष अण्णा आल्यावर मी शाळेत जाईल. एका निष्पाप व्यक्तीचा बळी घेतला गेला ते आरोपी, त्यांचे समर्थक हे भविष्याची चिंता करत आहेत, पण त्यांना एक निष्पाप माणूस मेला याचे दुःख नसल्याची प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.
अतिशय खालच्या स्तराची विचारसरणी घेऊन ही मंडळी जात आहेत. या आरोपींना, समर्थकांना नियती कधीच माफ करणार नाही. माझा नियतीवर संपूर्ण विश्वास आहे. यांचा काळाबाजार उठणार आहे. मला दुःख व्यक्त करण्याचा अधिकार सुद्धा या व्यक्तींनी ठेवला नाही. ही गोष्ट, ही बाब पहिल्या दिवशी समोर आली असती तर मग भयानक परिस्थिती झाली असती, आरोपी, समर्थकांनी हीच गोष्ट अपेक्षित असावी.
आरोपींना गोळ्या घाला
यावेळी धनंजय देशमुख यांनी आरोपी कुणाच्या जीवावर उडत होते. कुणाच्या जीवावर दहशत माजवत होते. कुणाच्या जीवावर हा सर्व प्रकार घडला असा सवाल केला. त्यांनी त्यावेळेच्या पोलिसांना या हत्येसाठी दोषी धरले. त्यांना सर्व माहिती असतानाही पोलिसांनी काहीच केले नाही. त्यांनी आरोपींना मोकाट सोडल्याचा आरोप केला. मागील पोलीस अधिक्षक बारगळ यांच्या मोबाईलचा सीडीआर काढला. तर त्यांना कोणत्या राजकीय नेत्यांचे फोन गेले हे समोर येईल. प्रकरण दाबण्यासाठी त्यांच्यावर कोणी दबाव टाकला हे तपासा असे ते म्हणाले.
इतक्या दिवस दुःख पाठीशी होतं. आता ते पायदळी घेणे अवघड असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. सर्व राज्याला माहिती आहे की एक ते सातपर्यंतच्या आरोपींना सांभाळणारा, त्यांना वाचवणारा माणूस कोण आहे. आरोपी कुणाच्या जीवावर उडत होते, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे अंगुली निर्देश केला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी बोलताना त्यांचा संताप समोर आला. ही परिस्थिती आमच्यावर का आली याचं उत्तर सरकारने द्यावे असे ते म्हणाले. सर्व मंत्रिमंडळ जरी बरखास्त केलं तरी फायदा काय, माझ्या भावाला ज्यांनी मारलं, त्यांना गोळ्या घालून मारलं तरच आम्ही त्यावर बोलू अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.