आयपीएलच्या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या 18 व्या मोसमात एकूण 10 संघांमध्ये 74 सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच या 74 सामन्यांचं आयोजन एकूण 13 शहरांमध्ये करण्यात आलं आहे. गतविजेता कोलकाता या हंगामातील पहिल्याच सामन्यात बंगळुरुविरुद्ध भिडणार आहे. या 18 व्या मोसमाला सुरुवात होण्यासाठी मोजून 1 आठवडा बाकी आहे. त्याआधी अखेर दिल्ली कॅपिट्ल्सने नव्या कर्णधाराचं नाव जाहीर केलं आहे. यासह या 18 व्या मोसमातील 10 संघांचे 10 कर्णधार निश्चित झाले आहेत. या 10 पैकी 3 कर्णधार हे महाराष्ट्रातले आहेत. त्या 3 पैकी दोघे मुंबईचे आणि 1 हा पुणेकर आहे.
अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड हे तिघेही महाराष्ट्रातील आहेत. अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे दोघे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतात. तर ऋतुराज गायकवाड हा पुण्याचा असून तो महाराष्ट्र क्रिकेट संघांच प्रतिनिधित्व करतो. रहाणे, अय्यर आणि गायकवाड या तिघांबाबत आपण जाणून घेऊयात.
अजिंक्य रहाणे
अजिंक्य रहाणे याचा यंदाच्या हंगामाआधीचा प्रवास आश्चर्यकारक असा राहिला आहे. अनसोल्ड प्लेअर ते कॅप्टन अशी मजल रहाणेने मारली आहे. रहाणे मेगा ऑक्शन 2025 मधील पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला होता. मात्र त्यानंतर झटपट फेरीत कोलकाताने रहाणेला आपल्या गोटात घेतलं. इतकंच नाही तर, रहाणेला कर्णधारपदाची जबाबदारीबी देण्यात आली.
श्रेयस अय्यर
श्रेयस अय्यर हा गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आहे. श्रेयसने आपल्या स्फोटक फलंदाजीसह दमदार नेतृत्वाच्या जोरावर केकेआरला 12 वर्षांनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. त्यानंतरही केकेआरने श्रेयसला करारमुक्त केलं. त्यानंतर पंजाब किंग्सने श्रेयसला आपल्या गोटात घेतलं. श्रेयस आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंजाबने श्रेयससाठी तब्बल 26 कोटी 75 लाख रुपये मोजले. तर त्यानंतर श्रेयसला कर्णधारही केलं.
ऋतुराज गायकवाड
तसेच पुणेकर ऋतुराज गायकवाड याला गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद देण्यात आलं. महेंद्रसिंह धोनी याने ऋतुराजला 21 मार्च 2024 रोजी कर्णधारपदाची सूत्र सोपवली. ऋतुराजला कर्णधार म्हणून पहिल्याच हंगामात चेन्नईला क्वालिफायमध्ये पोहचवता आलं नाही. कर्णधार ऋतुराजची 17 व्या मोसमातील (IPL 2024) कामगिरी ही 50 टक्के अशी राहिली. चेन्नईने 14 सामने खेळले. चेन्नईने त्यापैकी 7 जिंकले आणि 7 गमावले. चेन्नईने याआधी गायकवाड या नावावर भरभरुन प्रेम केलंय. संपूर्ण साऊथने दिग्गज अभिनेता शिवाजीराव गायकवाड अर्थात रजनीकांत यांच्यावर भरभरुन प्रेम केलंय. तसेच ते प्रेम ऋतुराजच्या वाट्यालाही आलंय. ऋतुराजला यंदाही चेन्नईचा पाठिंबा असणार आहे. त्यामुळे ऋतुराजने चेन्नईला यंदा चॅम्पियन करावं, अशी आशा चाहत्यांची असणार आहे.