Friday, November 14, 2025
Homeराजकीय घडामोडीफुले’ चित्रपटाच्या वादावर अजित पवार स्पष्टच बोलले; “जेव्हा ‘पद्मावत’ प्रदर्शित झाला..”

फुले’ चित्रपटाच्या वादावर अजित पवार स्पष्टच बोलले; “जेव्हा ‘पद्मावत’ प्रदर्शित झाला..”

अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहे. आधी ब्राह्मण महासंघाने या चित्रपटावर आक्षेप घेतला, त्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही त्यातील काही संवाद आणि दृश्यांवर कात्री चालवली. या चित्रपटाबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “चित्रपट कोणताही असो, त्याचा समाजावर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही, याची काळजी सरकार म्हणून आम्हाला घ्यावी लागते”, असं ते म्हणाले. ‘फुले’ हा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित आहे. यामध्ये ‘स्कॅम 1992’ वेब सीरिज फेम प्रतीक गांधी महात्मा फुलेंच्या आणि अभिनेत्री पत्रलेखा ही सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आहे.

 

काय म्हणाले अजित पवार?

“आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की जेव्हा महाराष्ट्रात एखादा चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा आधी सेन्सॉर बोर्ड तो चित्रपट बघतो. अनेक मान्यवर सेन्सॉर बोर्डाच्या समितीमध्ये आहेत. साधारणपणे त्या चित्रपटाचा समाजावर कुठलाही वेगळा परिणाम होणार का, वाईट परिणाम होणार का हे सर्व पाहिलं जातं, त्याची शहानिशा केली जाते. तुम्हालाही माहीत आहे की आजवर वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट आले. ज्यावेळी ‘पद्मावत’ हा चित्रपट आला होता, त्यावेळीही अशाच प्रकारची चर्चा झाली होती. चित्रपटाचं नाव आधी ‘पद्मावती’ होतं, नंतर ते ‘पद्मावत’ केलं आणि तो प्रदर्शित करण्यात आला. तरीदेखील काही घटकांचा त्याला विरोध होता. आपल्या संविधानाने, आपल्या घटनेनं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांनाच आपापलं मतस्वातंत्र्य दिलं आहे, विचारस्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे लोकं बोलतात. परंतु सरकार म्हणून आम्ही काळजी घ्यायची असते की त्यातून समाजात कुठलाही तेढ निर्माण होणार नाही, समाजामध्ये एकोपा राहील. याची खबरदारी आम्ही घेतो,” असं ते म्हणाले.

 

‘फुले’ चित्रपटातील सीन्स आणि डायलॉग्सवर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘काश्मीर फाइल्स, द केरळ फाइल्ससारख्या प्रचारकी चित्रपटांवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मात्र ‘फुले’सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. Who is Namdeo Dhasal? (नामदेव ढसाळ कोण आहेत) असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोकं बसतात याची कल्पना आली होती. पण आता ‘फुले’ चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. त्यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते,’ अशी टीका त्यांनी सेन्सॉर बोर्डावर केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -