करुण नायरनं 89 धावांची वादळी खेळी करुन देखील मंबई इंडियन्सच्या सांघिक कामगिरीपुढं दिल्ली कॅपिटल्सचा बालेकिल्ला ढासळला. दिल्ली कॅपिटल्सचा संघ 193 धावांवर बाद झाल्यानं मुंबईनं 12 धावांनी विजय मिळवला. दिल्लीचे मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यानं आणि चुकीचे फटके मारल्यानं त्यांना पराभव स्वीकारावा लागला. कर्ण शर्मानं घेतलेल्या 3 विकेट आणि जसप्रीत बुमराहच्या 19 व्या ओव्हरमध्ये तीन बॉलवर तीन फलंदाज रनआऊट झाले आणि दिल्ली कॅपिटल्सनं मॅच गमावली. मुंबईला दिल्लीचा विजयरथ रोखण्यात यश आलं. रोहित शर्मानं बाहेर थांबून लेग स्पिन गोलंदाजी सुरु ठेवण्याचा सल्ला हार्दिकला दिला अन् मुंबईनं विजय मिळवला.
करुण नायरची वादळी खेळी
दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात समाधानकारक झाली नाही. जॅक फ्रेजर-मॅक्गर्ग खातं न उघडता बाद झाला. यानंतर अभिषेक पोरेल आणि करुण नायर या दोघांनी 119 धावांची भागीदारी केली. करुण नायरनं चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्यानं 40 बॉलमध्ये 89 धावा केल्या. यामध्ये त्यानं 12 चौकार आणि 5 षटकार मारले. अभिषेक पोरेलनं 33 धावा केल्या. पोरेल बाद झाल्यानंतर दिल्लीच्या विकेट नियमित अंतरानं पडण्यास सुरुवात झाली. करुण नायरनं 89 धावा केल्या. केएल राहुलनं 15 ,अक्षर पटेलनं 9 , ट्रिस्टन स्टब्सनं 1 रन करुन बाद झाला. आशुतोष शर्मा 17 आणि विपराज निगम 15 धावा करुन बाद झाले.
तिलक वर्माचं अर्धशतक अन् मुंबईच्या 205 धावा
दिल्लीचा विजयरथ रोखायचा या इराद्यानं मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि रेयान रिकल्टन यांनी केली केली. रोहित शर्मा चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. त्यानं 18 धावा केल्या. तर, रिकल्टन यानं 41 धावा केल्या तर सूर्यकुमार यादवनं 40 धावा केल्या. तिलक वर्मानं सलग दुसऱ्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं. रेयान रिकल्टन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर आणि रोहित शर्मा यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं 200 धावांचा टप्पा ओलांडला. मुंबईनं 20 ओव्हरमध्ये 5 बाद 205 धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्मानं 59 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादव, विपराज निगम यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या तर मुकेश कुमारला 1 विकेट मिळाली.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, रेयान रिकलटन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह
दिल्ली कॅपिटल्स: जॅक फ्रेजर-मॅक्गर्ग, अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिशेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार