जगभरात प्रसिद्ध आणि कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मंदीर उडवून देण्याची धमकी देणारा मेल साईबाबा संस्थानला प्राप्त झालाय. दरम्यान, साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी रोज लाखो भाविक शिर्डीला जातात. यामध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश असतो. असे असतानाच आता हा मंदीर उडवून देण्याची धमकी देणारा मेल प्राप्त झाला आहे.
मेलद्वारे आली मंदीर उडवून देण्याची धमकी
धमकीचा हा मेल संस्थानच्या अधिकृत मेल अकाउंट आला आहे. हा मेल मिळताच साईबाबा संस्थानची सुरक्षा यंत्रणा तसेच पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल (2 मे) सकाळी धमकीचा मेल प्राप्त झाला होता. हा मेल मिळताच संस्थानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अज्ञाताविोरधात गुन्हा दाखल केला आहे. हा मेल नेमका कोणी केला? याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
यंत्रणा सतर्क, कसून तपासणी
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात वातावरण ढवळून निघाले आहे. आणखी अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. असे असतानचा आता शिर्डीतील साई मंदिराला धमकीचा मेल प्राप्त झाल्याने सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मंदिराच्या संस्थानाने नेमकं काय सांगितलं?
मंदिराच्या संस्थानने काय आवाहन केलं?
मंदीर उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर शिर्डीमध्ये भाविकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येत आहे. साईबाबा संस्थानसह हजारो पोलीसांचा ताफा येथे सज्ज ठेवण्यात आला आहे. साईभक्तांनी कोणतीही भीती न बाळगता दर्शनासाठी यावं, असं आवाहन साईमंदिर प्रशासनाने केलं आहे.
शिर्डीत सामूहिक विवाह सोहळा
दरम्यान, शिर्डी हे शहर साईबाबांमुळे ओळखलं जातंच. पण या शहरात अनेक समाजोपयोगी उपक्रम घेतले जातात. 1 मे रोजी सामूहिक विवाह सोहळ्यात 65 जोडप्यांचा विवाह शाही थाटात पार पडला. गेल्या 25 वर्षापासून शिर्डीतील कोते दांम्पत्याच्या पुढाकारातून हा विवाह सोहळा आयोजीत केला जातो. यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने मोठ्या थाटात हा विवाह सोहळा पार पडलाय. या सामूदायिक विवाह सोहळ्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील वर-वधूंचा सहभाग मोठ्या संख्येने दिसून आला.