एकतर्फी प्रेमप्रकरणातून युवतीची बदनामी करणाऱ्या युवकास जाब विचारल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारीची घटना हेर्ले (ता. हातकणंगले) येथे घडली. या प्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला असून, आठजणांना अटक केली आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हेरले येथील गणेश रमेश ढेरे (वय २६) याचे हातकणंगले तालुक्यातील एका गावातील मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्यातून तो त्या मुलीचे जमलेले लग्न मुलग्याच्या घरी फोन करून मोडत होता. याचा जाब विचारण्यासाठी पीडित मुलीचे नातेवाईक संशयित ढेरे याच्या घरी गेले. त्यावेळी गणेश ढेरे, त्याचा भाऊ सुशांत ढेरे व त्याच गल्लीतील सहा जणांनी जाब विचारण्यास आलेल्या पीडितेच्या नातेवाइकांना शिवीगाळ करत लाकडी फळी, काठीने मारहाण केली.
याप्रकरणी पोलिस ठाण्यात पीडितेच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीनुसार गणेश ढेरे याच्यासह त्याचा भाऊ सुशांत ढेरे (वय ३०), कुमार कारंडे (वय ४४), अमोल कारंडे (वय ४२), प्रदीपकुमार कारंडे (वय ३५), धनाजी आनंदा कारंडे (वय ५५), सुनील मधुकर कारंडे (वय ५०), संतोष गणपती भोसले (वय ४८) यांच्या विरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून सर्व संशयितांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, युवकांच्या आठ ते दहा जणांच्या जमावाकडून घरात घुसून लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी गणेश ढेरे याने दिलेल्या तक्रारीनुसार पीडितेच्या आठ नातेवाइकांविरोधात हातकणंगले पोलिसांत गुन्हानोंदविला आहे.