पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terror attack) भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे पाकिस्तान आणि पीओकेमधील लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. संपूर्ण देशभरात भारतीय सैन्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी चार शब्दात त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘पिक्चर अभी बाकी है’, असं वक्तव्य करत मनोज नरवणे यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.
जर पाकिस्तानने भारतातील लष्करांवर हल्ले सुरु केले तर ऑपरेशन सिंदूर सारखे आणखी हल्ले शक्य होणार असल्याचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 26 नागरिकांच्या क्रूर हत्याकांडानंतर धाडसी आणि सुनियोजित प्रत्युत्तर म्हणून, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानी हद्दीत मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरू केली आहे.
क्षेपणास्त्र हल्ल्यात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त
भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईत नऊ प्रमुख दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. ही ठिकाणे दहशतवादी कारवायांची केंद्रे मानली जात होती. संरक्षण मंत्रालयाने ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला अचूक आणि संयमी प्रतिसाद म्हणून वर्णन केले. या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचे दोन टॉप दहशतवादीही मारले गेले आहेत.
संरक्षण मंत्रालयानं नेमकं काय म्हटलंय?
कोणत्याही पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठानांना भारतीय सैन्यांनी लक्ष्य केले गेले नाही. हे भारताच्या नियोजनबद्ध आणि चिथावणीखोर दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. अनावश्यक चिथावणी टाळून गुन्हेगारांना जबाबदार धरण्याच्या भारताच्या दृढनिश्चयाला हे ऑपरेशन अधोरेखित करते,” असे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत एक्स हँडलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. सीमेपलीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या दहशतवादविरोधी कारवाईला युद्धाचे कृत्य म्हणून वर्णन केले आणि म्हटले की त्याला योग्य उत्तर दिले जाईल.
फक्त 23 मिनिटांत भारतीय सैन्यानं केलं ‘ऑपरेशन सिंदूर’
पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या 26 पर्यटकांच्या मृत्यूचा बदला भारतानं पाकिस्तानच्या घरात घुसून घेतला. पाकिस्ताननं (Pakistan) आसरा दिलेल्या तब्बल 9 दहशतवादी तळांच्या भारतानं चिंध्या उडवल्या. भारतानं याला ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) असं नाव दिलंय. पहलगाममध्ये ज्यांचं कुंकू पाकच्या दहशतवाद्यांनी हिरावलं, त्या सर्व महिलांचा बदला आज भारतीय सैन्यानं घेतला. संपूर्ण देशभरात भारतीय सैन्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. पण, दुसरीकडे पाकिस्तान मात्र पुरतं भांबावलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतासोबत युद्धाची तयारी करणाऱ्या पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’नं जोरदार धक्का दिला आहे. फक्त 23 मिनिटांत भारतीय सैन्यानं पाकिस्तानचा माज उतरवला.