आळते (ता- हातकणंगले) येथील तिघा खासगी सावकारांनी मौजे मुडशिंगी येथील औषधी दुकानदाराला व्याजाने दिलेल्या ७ लाखांचे २४ लाख वसूल केले. खासगी सावकाराने परत १७ लाखांची मागणी केल्याने तिघा सावकारांविरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औषधी दुकानदार उत्तम तानाजी पाटील (रा. मुडशिंगी ता. हातकणंगले) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विजय आप्पासो चव्हाण (वय-३९), विष्णू आण्णासो जाधव (वय-४५), संतोष बाळू रोहिले (वय-४२, सर्व रा. आळते ता. हातकणंगले) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अधिक माहितीनुसार, उत्तम पाटील यांचे मौजे मुडशिंगी येथील गणेश मंदिराजवळ औषधी विक्रीचे दुकान आहे. त्यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये व्यवसाय आणि वैयक्तिक कारणासाठी आळते येथील विजय चव्हाण, विष्णू जाधव आणि संतोष रोहिले यांच्याकडून प्रति माहिना ३ टक्के व्याजदराने ७ लाख रुपये घेतले होते. उत्तम पाटील यांनी वेळोवेळी व्याज आणि घेतलेली मुद्दल अशी २४ लाख रुपयांची परतफेड केली.
तरीसुद्धा या खासगी सावकारांनी उत्तम पाटील यांच्याकडे आणखी १७ लाख रुपये देण्यासाठी तगादा लावला होता. तसेच उत्तम पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून पाटील यांनी तिघा खासगी सावकारांविरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी विजय आप्पासो चव्हाण, विष्णू आण्णासो जाधव, संतोष बाळू रोहिले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस अधिक तपास करीत आहेत.