टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने अवघ्या काही दिवसांआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहितने त्याआधीच टी 20i फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. त्यामुळे आता रोहित फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर अनेक स्तरातून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसेच आजी माजी खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट करत रोहित सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. निवृत्तीच्या काही दिवसानंतर आता रोहितने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी रोहितसोबतचे काही फोटो पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली. फडणवीस यांनी रोहितला कसोटी निवृत्ती नंतरच्या उर्वरित प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या. रोहित शर्मा याची मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाण्याची 11 महिन्यांमधील दुसरी वेळ ठरली.
रोहित शर्मा याने 7 मे रोजी इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. रोहितने इंग्लंड दौऱ्याआधी हा निर्णय घेतला. रोहितने आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान कसोटीतून निवृत्त होण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. तर आता भारत-पाकिस्तान यांच्यातील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा एकदा आयपीएलच्या 18 व्या मोसमातील उर्वरित 17 सामन्यांचा थरार रंगणार आहे. बीसीसीआयने सोमवारी 12 मे रोजी 17 सामन्यांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार मुंबई इंडियन्सचा पुढील सामना हा 21 मे रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यानिमित्ताने पलटण मुंबईत आहे. अशात रोहितने कसोटीतील निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांची एक्स पोस्ट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहितसोबत अनेक विषयांवर संवाद साधला. तसेच रोहितला निवृत्तीनंतर पुढील प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या. “वर्षा माझ्या अधिकृत निवासस्थानी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचे स्वागत करणं, त्यांना भेटणं आणि त्यांच्याशी संवाद साधून खूप छान वाटलं. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याबद्दल आणि त्यांच्या प्रवासाच्या पुढील टप्प्यात यश मिळावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या”, असं फडणवीस यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय.
रोहित शर्मा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
रोहित 11 महिन्यांत दुसऱ्यांदा वर्षावर
दरम्यान रोहितची ‘वर्षा’वर जाण्याची 11 महिन्यांमधील दुसरी वेळ ठरली. टीम इंडियाने 29 जून 2024 रोजी रोहितच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी 20 वर्ल्ड कप उंचावला होता. त्यानंतर टीम इंडियाचा भारतात आणि मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 जुलै रोजी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या वर्ल्ड कप विजेता संघातील खेळाडूंचं वर्षावर स्वागत केलं होतं. अशाप्रकारे रोहितची ही वर्षावर जाण्याची गेल्या 11 महिन्यांमधील दुसरी वेळ ठरली.