हरियाणाच्या हिस्सारमधून ज्योती मल्होत्रा नावाच्या यूट्यूबरला (YouTuber Jyoti Malhotra) अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा ज्योती मल्होत्रावर आरोप आहे. ज्योती मल्होत्रा ही ट्रॅव्हल व्ह्लॉगर आहे. ती पाकिस्तानच्या हाय कमिशनमध्ये कार्यरत असलेल्या दानिश नावाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. दानिश याने ज्योतीला पाकिस्तानातही पाठवलं होतं. पाकिस्तानात जाऊन तिने गुप्त माहिती पुरवल्याचं उघड झालं आहे. दरम्यान आतापर्यंत पंजाब आणि हरियाणातून 6 पाकिस्तानी हेरांना अटक करण्यात आली आहे.
ज्योती मल्होत्राच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरुन एक मोठी माहिती समोर आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला व्हायच्या आधी एक महिना आधी ज्योती श्रीनगर आणि पहलगाममध्ये गेली होती. त्या नंतर मार्च महिन्यात ती पाकिस्तानमध्ये गेली होती.
YouTuber Jyoti Malhotra Arrested : पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यासोबत संबंध
ज्योती मल्होत्राचे पाकिस्तानच्या दानिश हसान-उर-रहीम उर्फ दानिश या अधिकाऱ्याच्या संपर्कात होती अशी माहिती समोर आली. 2023 साली ज्योती पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयामध्ये गेली होती. पाकिस्तानला जाण्यासाठी तिला व्हिसाची गरज होती. त्या ठिकाणी दानिश या अधिकाऱ्याशी ओळख झाली आणि नंतर त्यांचा मोबाईलवर संपर्क वाढला.
Jyoti Malhotra Instagram Reel : आयएसआयच्या अधिकाऱ्यांना भेटली
त्यानंतर ज्योती दोनदा पाकिस्तानला गेली आणि दानिशच्या सल्ल्यानुसार तिथे अली अहवानला भेटली. अली अहवानने पाकिस्तानमध्ये त्याच्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली. अली अहवानने ज्योतीची ओळख पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांशी करून दिली. या काळात ती शाकीर आणि राणा शाहबाज नावाच्या दोन लोकांनाही भेटली.
कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिने शाकीरचा मोबाईल नंबर जाट रंधावा या नावाने सेव्ह केला होता. भारतात परतल्यानंतर, ती स्नॅपचॅट, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे या लोकांशी संपर्कात राहिली आणि देशविरोधी माहिती देऊ लागली. या काळात ती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिश यांच्या सतत संपर्कात होती. ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे.
सुरक्षा एजन्सींचे बारीक लक्ष
हि्स्सार पोलिसांनी ज्योतीला न्यायालयात हजर केले आणि तिला 5 दिवसांच्या रिमांडवर घेतले. हिस्सार पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 15 मे रोजी डीएसपी जितेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ज्योतीला तिच्या घरातून ताब्यात घेतले. तिच्याविरुद्ध हिसार सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता केंद्रीय एजन्सी ज्योतीची चौकशी करत आहेत.