मिरजेत जादा परताव्याच्या आमिषाने शासकीय कर्मचाऱ्याची ३० लाखांची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्यावर गुंतवणूक सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन कल्लापा येडुरे व अक्षता नितीन येडुरे (दोघेही रा. बुधवार पेठ, मिरज) यांनी त्यांच्या सानवी इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटी एलएलपी या फर्मच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चार टक्के दराने अधिक पैसे देण्याचे आमिष दाखवून जावेद हारुण शेख (वय ३८), रा. सांगली या पाटबंधारे कर्मचाऱ्याची ३० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जावेद शेख यांनी मिरज शहर पोलिसांत फिर्याद दिली. याबाबत शहर पोलिसात २ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येडूरे दाम्पत्याने अशा प्रकारे अनेकजणांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यामुळे या दाम्पत्यावर गुंतवणूक सुरक्षेबाबत नवीन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार पोलिसांना जादा अधिकार असून, महसूल विभागाला फसवणुकीच्या रकमेच्या वसुलीचे अधिकार आहेत.
मिरज-सांगली परिसरांत ज्यांची या दाम्पत्याने फसवणूक केली आहे, अशांनी संपर्क साधण्याचे आवाहन मिरज शहर पोलिसांनी केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक भैरवनाथ पाटील पुढील तपास करीत आहेत.