गेल्या काही दिवसांपासून फक्त पुणे, मुंबईच नाहीतर इतरही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच केरळमध्ये आठ दिवस तर महाराष्ट्रात बारा दिवस आधी दाखल झालेल्या मान्सूनने मुंबईत पोहोचण्याचा 117 वर्षांचा विक्रम मोडला.
मात्र, 27 मे पासून म्हणजेच मंगळवारपासून मोसमी पावसाच्या प्रवासाची गती कमी होणार आहे. शुक्रवारपासून (दि.30) आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सुमारे 10 ते 15 दिवस लवकर मोसमी वारे पुण्यात दाखल झाले. मात्र, मंगळवारी पावसाची तीव्रता थोडी कमी झाली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणेनऊपर्यंत शिवाजीनगर येथे १५.७, लोहगाव येथे २३.२, चिंचवड येथे २९, मगरपट्टा येथे १८, कोरेगाव पार्क येथे ५, तर एनडीए येथे २४.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यापूर्वीही काही दिवस सातत्याने शहर आणि परिसरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर सोमवारीही शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडला.
दरम्यान, पुढील तीन दिवसांत घाट परिसरात मुसळधार, तर शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शुक्रवारपासून (दि.३०) आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान होईल कोरडे
डॉ. देवरस यांच्या अंदाजानुसार, 27 मे पासून राज्यातील हवामान हळूहळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढही होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पाच जूनपर्यंत ही स्थिती कायम राहील. यामुळे पाच जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मोसमी पावसाची शक्यता दिसत नाही. मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनचा पुढील प्रवास तात्पुरता थांबू शकतो.
परदेशातील हवामानाचा पहिल्यांदाच परिणाम
मंगळवारी पश्चिम रशियावर एक जास्त दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच विदेशातील हवामान बदलाचा परिणाम भारतावर होणार आहे. रशियावर निर्माण होणारा कमी दाबाचा पट्टा भारतातील आणि विशेष करून महाराष्ट्रातील मोसमी पावसावर नकारात्मक परिणाम करेल. तो वाऱ्यांच्या दिशेत मोठे बदल घडवून आणणार आहे.