ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यात किरकोळ वादातून एका टोळक्याने २० वर्षीय तरुणाची निर्घृणपणे चाकूने भोसकून हत्या केली आहे. क्रिकेटच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित दोन आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
ठाण्यात हत्या झालेल्या मुलाचे नाव शिवम करोतिया (२०) असे आहे. तो ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात वास्तव्याला होता. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळताना काही तरुणांमध्ये वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी शिवमवर धारदार चाकूने हल्ला केला. यावेळी शिवमच्या पाठीवर उजव्या बाजूला चाकूने गंभीर वार करण्यात आले. या हल्ल्यानंतर शिवम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
उपचारादरम्यान शिवमचा मृत्यू
त्यानंतर शिवमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान शिवमचा मृत्यू झाला. एका क्षुल्लक क्रिकेटच्या वादातून एका तरुणाची अशाप्रकारे हत्या झाल्याने वागळे इस्टेट परिसरात आणि संपूर्ण ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दोन आरोपींचा शोध सुरु
या घटनेची माहिती देताना, वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी सविस्तर माहिती दिली. “आम्ही एका आरोपीला अटक केली असून, फरार असलेल्या दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल.” अशी माहिती शिवाजी गवारे यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.