जेमतेम सोळा वर्षांच्या पोराने तब्बल सोळा लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर आणि रोख रकमेवर डल्ला मारला आणि चैनीवर हजारो रुपयांची उधळण करायला सुरुवात केली. पोलिस चार दिवसांपासून या चोरीचा छडा लावण्यासाठी जंग जंग पछाडत होते.
चोरी झालेल्या घरातील कुटुंबीय हवालदिल झाले होते. त्याचवेळी हे सोळा वर्षांचं पोरगं मॉलमध्ये जात ब्रँडेड आणि महागडे कपडे, आईस्क्रीम, पिझ्झासह चैनी करत होते. साहजिकच पोलिसांनी त्याच्याकडे नजर फिरवली आणि चोरीचा छडा लागला.
नववीत शिकणार्या या मुलाने तब्बल 15 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल (दागिन्यांसह) पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. या प्रकरणात आणखी कुणी सहभागी आहे का याचाही आता पोलिस शोध घेत आहेत. शनिवार पेठेतील रहिवासी शुभांगी सुजय म्हेत्रे यांच्या घरी 25 ते 31 मे 2025 या काळात चोरी झाली होती. म्हेत्रे कुटुंब देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना चोरट्याने कपाटाच्या किल्ल्या शोधून तब्बल 18 तोळे सोन्याचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकड लंपास केली होती. शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या परिसरात झालेल्या या चोरीमुळे केवळ म्हेत्रे कुटुंबच नाही, तर पोलिस यंत्रणाही हादरली होती.
सुरुवातीला पोलिसांनी मोलकरणीवर संशय घेतला, तिची कसून चौकशी केली आणि तिच्या घरात झडतीही घेतली. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासले. पण लक्ष्मीपुरी पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांच्या पथकांनी दिवस-रात्र तपास केला. पण कोणताही सुगावा मिळत नव्हता. वर्षानुवर्षांच्या कमाईवर एका झटक्यात डल्ला मारल्याने म्हेत्रे कुटुंब पूर्णपणे हतबल झाले होते.
चैनीतून संशय आणि क्षणात गुन्हेगार हाती
पोलिस निरीक्षक कण्हेरकर यांच्या कानावर एक खबर आली. म्हेत्रे यांच्या घराजवळच राहणारा एक शाळकरी मुलगा सध्या चैनीवर अफाट पैसे उधळत आहे. एवढा पैसा या शाळकरी मुलाकडे कुठून आला, या शंकेने पोलिसांचे कान टकवारले. सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांनी तातडीने नववीत शिकणार्या या मुलाला ताब्यात घेतले.
सुरुवातीला मुलगा रडायला लागला, अंगावरील महागडे कपडे पाहून पोलिसांनी प्रश्नांचा भडीमार केला, पण तो दाद देईना. त्याला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला, पालकांसमोर त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. पण एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे तो पोलिसांना उत्तरे देत होता. शेवटी, ‘मेरी आवाज सुनो’ हा डायलॉग बोलूनही तो काही बोलेना. पण प्रत्यक्ष चार फटके मिळताच तो पोपटासारखा बोलू लागला!
मुद्देमाल हस्तगत, म्हेत्रे कुटुंबाला दिलासा
पोलिसांनी दागिन्यांबद्दल विचारले असता त्याने सर्व दागिने टेरेसवर पत्र्याच्या आडोशाला लपवून ठेवल्याचे सांगितले. शिल्लक रक्कमही त्याने पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांनी 18 तोळे सोन्याचे दागिने आणि उर्वरित रोकड हस्तगत केली आहे. आपला आयुष्यभराचा ठेवा परत मिळाल्याने म्हेत्रे कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. संशयित शाळकरी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
किल्ली दिसली, लॉकर उघडलं आणि…
म्हेत्रे यांच्या घराशेजारी राहात असल्याने या मुलाचे त्यांच्या घरी नेहमीच येणे-जाणे होते. त्यांच्या आर्थिक परिस्थितीची त्याला कल्पना होती. घरात कोणी नसताना एकदा तो घरात शिरला, तेव्हा त्याला कपाटाजवळच किल्ल्या दिसल्या. त्याने लॉकर उघडले तर आत दागिन्यांचा ढीग आणि पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल दिसले. क्षणार्धात त्याने सर्व दागिने आणि रोकड उचलली आणि थेट आपले घर गाठले. टेरेसवर पत्र्याच्या आडोशाला त्याने दागिने आणि काही रक्कम लपवली. तो थेट मॉलमध्ये गेला. तिथे त्याने नवीन कपडे खरेदी केले, पिझ्झा मागवला, महागडे आईस्क्रीम खाल्ले आणि हॉटेलमध्ये जाऊन चमचमीत जेवण करून मनसोक्त मौजमजा केली. इतकी उधळपट्टी करूनही त्याचे पैसे संपत नव्हते.