शेअर मार्केटचा क्लास काढला…शिकायला येणाऱ्यांना गुंतवणूक करायला भाग पाडले…शाहूपुरी, बाबूजमाल परिसरातील हे क्लासचालक रात्रीत पसार झाले. दुसरीकडे दुप्पट ते चौपट परतावा देण्याच्या नावाखाली मोठमोठ्या कंपन्यांनी रात्री गाशा गुंडाळून पोबारा केला.
काही दिवस पसार झाल्यानंतर यातील एजंट आता उजळ माथ्याने वावरू लागले आहेत. ए. एस. ट्रेडर्स, ग्रोबर्झ, मेकर ॲग्रो कंपनी, रचना ॲग्रो कंपनी, प्राईम ॲग्रो कंपनी, वेल्थ शेअर्ससारख्या कंपनीत पैसे अडकल्याने काही दिवसांपूर्वी ‘लखपती’ असणारे गुंतवणूकदार ‘कंगाल’ बनले आहेत.
शेअर मार्केट, फॉरेक्स ट्रेडिंग, बिट कॉईन, क्रिप्टो करन्सीसारख्या गुंतवणुकीच्या नावाखाली कोल्हापूरकरांची कोट्यवधींची रक्कम हडपली. पाच वर्षांत या गुन्ह्यांना उत आला आहे. स्थानिक पोलिस ठाण्यापासून आर्थिक गुन्हे शाखेचे उंबरे झिजवून गुंतवणूकदारांची दमछाक झाली. कोणतीही माहिती न घेता समोरील व्यक्तीचा रुबाब पाहूनच अनेकजण यात ओढले गेले. झटपट पैशांच्या योजनांकडे वळलेल्यांना आर्थिक भुर्दंड सहन करताना मनस्तापाची वेळ आली आहे.
–
व्हाईट कॉलर गुन्हेगारी…
एक लाख रुपये गुंतवून दर महिन्याला आठ हजारांचा परतावा देण्याचे आमिष नेहरुनगरातील दांपत्यासह टोळक्याने दाखवले. जेमतेम शिक्षण झालेल्या म्होरक्याने एक क्लास उघडला होता. येणाऱ्या विद्यार्थ्यांकरवी गुंतवणुकीची योजना पसरवली. पाहता पाहता ६०० गुंतवणूकदार जाळ्यात अडकले. या सर्वांची रक्कम कुठे चित्रपटनिर्मितीत, तर कुठे इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीत लावून सुरुवातीला परतावा दिला. या संचालकाने स्वतःच्या मुलाचा वाढदिवस आलिशान हॉटेलमध्ये साजरा करून सर्व गुंतवणूकदारांना थाट दाखवला. दाक्षिणात्य डायरेक्टरला सोबत घेऊन चित्रपट बनविण्याची घोषणाच त्याने या कार्यक्रमात केली. शेअर मार्केटसह फॉरेक्समध्ये त्याने लावलेल्या पैशांत तोटा येताच उर्वरित रक्कम घेऊन त्याने पोबारा केला.
कर्जे काढून गुंतवणुकीचा
अजब कारभार…
गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखविणारे महिन्याला १० ते १५ टक्के परतावा देऊ लागल्याने काहींनी इतर बॅंकातून कमी व्याजाची कर्जे काढली. कर्जाची रक्कम भामट्यांच्या हाती सोपवून हप्ते स्वतः फेडू लागले, पण जेव्हा अशा कंपन्या बंद पडल्या तेव्हा मात्र, कर्जाबद्दल डोक्यावर हात मारण्याची वेळ अनेकांवर आली. व्यावसायिक कर्ज घेण्यासाठी जयसिंगपूरच्या एका पुजाऱ्याने कमिशनवर बॅंक कर्जे काढून देण्याऱ्या महिलेला ४३ लाखांची रक्कम दिली; मात्र तिच्याकडून ना कर्ज मिळाले, ना परतावा. याप्रकरणातही संबंधित पुजाऱ्याने आईच्या नावाने पतसंस्थेत कर्ज काढून संशयित महिलेला रक्कम देऊ केल्याचे समोर आहे.
कोल्हापूरकरांची अडकेली रक्कम…
बिटकॉईन, क्रिप्टो करंन्सीत अडकलेली रक्कम –
-शाहूपुरी पोलिस ठाणे- ४ कोटी ५८ लाख – ०६ संशयित
-गांधीनगर पोलिस ठाणे – १३ कोटी ९२ लाख ८६ हजार – ०६ संशयित
-इचलकरंजी पोलिस ठाणे – १२ कोटी ३८ लाख – १७ संशयित
आर्थिक गुन्हे शाखेकडील तपासावरील प्रकरणे….
-ए. एस. ट्रेडर्स – ४५ कोटी
-मेकर ॲग्रो कंपनी – ६ कोटी
-मॉर्गन स्टॅन्ले कंपनी – ४ कोटी
-रचना ॲग्रो सर्व्हिसेस – दीड कोटी
-गोल्ड लाईफ कंपनी -५ कोटी
-वेल्थ शेअर्स – दीड कोटी




