भरधाव ट्रकने दोन मोटारींसह दुचाकीला धडक दिल्याने अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (ता. २२) पहाटे सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव उड्डाणपुलावर घडली.
अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालकास सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली.
किरण पवार (वय-२५, रा. श्रमसाफल्य कॉलनी, कर्वेनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या यश जयप्रकाश किरदत्त (वय-२५, रा. श्रमसाफल्य कॉलनी, कर्वेनगर) याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी यश किरदत्त याने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रकचालक महंतेश श्रीकांत अंदोडगी (वय-३७, रा. गोलसार, ता. इंडी, कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश आणि त्याचा मित्र किरण पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर वडगाव उड्डाणपुलावरून घरी निघाले होते. त्यावेळी भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर ट्रकने दोन मोटारींनाही धडक दिली. त्यात मोटारींचे नुकसान झाले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.
याबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी यश आणि किरण या दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच किरणचा मृत्यू झाला. फरार ट्रकचालक महंतेश अंदोडगीला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली.
वडगाव उड्डाणपुलावर भरधाव वाहनांमुळे सतत अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वी मोटारीच्या धडकेने एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला होता. तसेच, अपघातानंतर भरघाव मोटार उड्डाणपुलावरून सेवा रस्त्यावर कोसळली होती. त्यात मोटारचालकासह त्याचे मित्र जखमी झाले होते.