“आठवी वर्गात प्रवेश हवा असेल, तर तुमच्या गावातील पाचवीचा एक विद्यार्थी आमच्या शाळेत आणा,” अशी अजब अट घालून पूर्णा तालुक्यातील एका खासगी शाळेने जिल्हा परिषद शाळेच्या अस्तित्वावरच घाला घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पिंपळा लोखंडे येथील श्री तुळजाभवानी या खासगी विद्यालयाच्या या मनमानी कारभारामुळे पांगरा येथील जिल्हा परिषद शाळेतील पाचवीचा वर्ग बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
काय आहे नेमका प्रकार?
पांगरा (लासीना) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातवीपर्यंत आहे. त्यामुळे सातवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आठवीच्या प्रवेशासाठी जवळच असलेल्या पिंपळा लोखंडे येथील श्री तुळजाभवानी विद्यालयात जातात. मात्र, तिथे प्रवेशासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना एक अनपेक्षित अट घातली जात आहे. “तुम्हाला आठवीत प्रवेश हवा असेल, तर पांगरा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारा तुमचा भाऊ, बहीण किंवा नातेवाईक असलेल्या पाचवीच्या विद्यार्थ्याला आमच्या शाळेत प्रवेशासाठी आणावे लागेल,” असे या खासगी शाळेतील शिक्षक सांगत असल्याचा आरोप पालक आणि ग्रामस्थांनी केला आहे.
अजब अटीमुळे पालकांची मोठी कोंडी
या अजब अटीमुळे पालकांची मोठी कोंडी झाली आहे. आपल्या मुलाच्या आठवीच्या प्रवेशासाठी ते नाईलाजाने पांगरा जिल्हा परिषद शाळेत जाऊन पाचवीत शिकणाऱ्या मुलांचा शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) मागत आहेत. परिणामी, जिल्हा परिषद शाळेतील पाचवीच्या वर्गाची पटसंख्या झपाट्याने कमी होत असून, हा वर्ग बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
ग्रामस्थ आणि व्यवस्थापन समिती आक्रमक
खासगी शाळेच्या या भूमिकेमुळे पांगरा गावातील नागरिक आणि शाळा व्यवस्थापन समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आठवीच्या प्रवेशाच्या बदल्यात पाचवीचा विद्यार्थी मागण्याचा हा शिक्षण विभागाचा कोणता नियम आहे? हा प्रकार म्हणजे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा आहे,” असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. या प्रकाराची तातडीने दखल घेऊन जिल्हा परिषद शाळेचे अस्तित्व वाचवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.
– रमेश ढोणे, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, पांगरा”आमच्या गावातील शाळा टिकवण्यासाठी आम्ही स्वखर्चाने अनेक सुविधा उपलब्ध करून देत आहोत. असे असताना, पिंपळा येथील खासगी शाळा आमच्याच शाळेतील विद्यार्थी पळवण्यासाठी सक्ती करत आहे. त्यांना हा अधिकार कोणी दिला? गटशिक्षणाधिकाऱ्यांनी यावर तात्काळ बंधन घालावे.” – जगदीश ढोणे, ग्रामपंचायत सदस्य, पांगरा”हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आम्ही पालकांना आणि शिक्षकांना पाचवीच्या विद्यार्थ्यांची टीसी देऊ नका अशी विनंती केली. मात्र, खासगी शाळेच्या दबावामुळे पालक हतबल झाले आहेत. शिक्षण विभागाने हा प्रकार त्वरित थांबवावा.”