कर्नाटकच्या राजधानीतून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. चिकपेटजवळील सीके अचुकट्टू परिसरात (Achukattu Police) एका महिलेचा मृतदेह कचरा गाडीत आढळला. हा मृतदेह एका मोठ्या पोत्यात भरून टाकण्यात आला होता.
विशेष म्हणजे, महिलेचे (Woman) पाय गळ्याभोवती बांधले गेले होते, ज्यामुळे या प्रकरणात हत्येचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला.
हत्या प्रकरणात मोठा खुलासा
पोलिस तपासात या महिलेची ओळख ‘आशा’ (वय 40) अशी पटली असून, तिची हत्या शमशुद्दीन (वय 33) या व्यक्तीने केल्याचे उघड झाले आहे. आशा आणि शमशुद्दीन गेल्या दीड वर्षांपासून विवाहित जोडप्याप्रमाणे राहत होते. दोघंही आधीपासून विवाहित असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांनी इतरांना पती-पत्नी असल्याचे सांगत एकत्र घर भाड्याने घेतले होते.
दारूच्या वादातून हत्या
प्राथमिक चौकशीनुसार, आशा आणि शमशुद्दीन यांच्यात दारू पिण्यावरून वाद झाला, जो पुढे हिंसाचारात बदलला. वाद टोकाला गेल्यावर, शमशुद्दीनने आशाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरून, स्वतःच्या वाहनातून नेऊन BBMP कचरा गाडीत टाकला.
कचरा कर्मचाऱ्यांमुळे प्रकरणाचा उलघडा
बीबीएमपीचे स्वच्छता कर्मचारी नियमित कचरा गोळा करत असताना, एका पोत्यातून दुर्गंधी आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहून गळा दाबल्याची शक्यता स्पष्ट झाली. मान आणि हात बांधलेले असल्याचेही निदर्शनास आले.
सीसीटीव्ही तपास सुरु
घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. एक संशयित ऑटो रिक्षा घटनास्थळाच्या दिशेने जाताना दिसत आहे, ज्याच्या आधारे पुढील तपास केला जात आहे. पोलिसांनी शमशुद्दीनला अटक केली असून, त्याच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे.