तुम्ही पहिली नोकरी करणार असाल तर केंद्र सरकार दोन हप्त्यांमध्ये एक महिन्याचा पगार किंवा जास्तीत जास्त 15 हजारांपर्यंत देणार आहे. म्हणजे नोकरी मिळवा आणि रोख रक्कमही घ्या. तसेच मालकाला दरमहा तीन हजार रुपये मिळणार आहेत. केंद्र सरकारने मंगळवारी 1.07 लाख कोटी रुपयांच्या रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला (Employment Linked Incentive) मंजुरी दिली. चला जाणून घेऊया या प्रोत्साहनाचा लाभ कोणाला आणि कसा मिळेल.
दोन हप्त्यांमध्ये मिळणार 15 हजार रुपये
पहिल्यांदाच केंद्र सरकार त्यांचा एक महिन्याचा पगार किंवा जास्तीत जास्त 15 हजार रुपयांपर्यंत देणार आहे. नवीन कर्मचारी नेमणाऱ्या नियोक्त्यांना तीन हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन मिळणार आहे. सहा महिन्यांची सेवा पूर्ण केल्यानंतर पहिला हप्ता आणि बारा महिन्यांची सेवा पूर्ण केल्यानंतर दुसरा हप्ता अशा दोन हप्त्यांमध्ये 15 हजार रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी Employment Linked Incentive ची घोषणा केली.
नोकरी मिळताच पगार मिळेल का?
नाही. पहिला हप्ता 6 महिन्यांनंतर आणि दुसरा हप्ता 12 महिन्यांची सेवा पूर्ण झाल्यानंतर आणि वित्तीय साक्षरता कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर दिला जाईल. बचत खात्यात काही पैसे जमा करा, जे नंतर काढता येतात. 1.92 कोटी युवकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणाऱ्या या योजनेसाठी 1.07 लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. रोजगार वाढविणे आणि कंपन्यांना अधिक रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ही योजना उत्पादन क्षेत्राला बळकटी देण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. यामुळे दोन वर्षांत साडेतीन कोटी नवे रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. ही योजना 2024-25 च्या अर्थसंकल्पातील 2 लाख कोटी रुपयांच्या रोजगार पॅकेज योजनेचा भाग आहे.
कोणाला आणि कसा फायदा होणार?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) प्रथमच नोंदणी केलेल्या तरुणांना ELI योजनेचा लाभ मिळणार आहे. एक महिन्याच्या पगारापर्यंत म्हणजेच जास्तीत जास्त 15 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत सरकार दोन हप्त्यांमध्ये देणार आहे. यासाठी किमान 1 वर्ष म्हणजे 12 महिने काम करणे बंधनकारक आहे. याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला EPFO कडे नोंदणी करावी लागेल. नोकरीचा कालावधी 6 महिन्यांचा असेल तर पहिला हप्ता तुमच्या खात्यात येईल आणि दुसरा हप्ता 1 वर्ष पूर्ण झाल्यावर मिळेल. तसेच वित्तीय साक्षरता कार्यक्रमात सहभागी होणे बंधनकारक आहे; त्याशिवाय तुम्हाला प्रोत्साहनपर रक्कम मिळणार नाही.
कंपन्यांना काय मिळणार?
कर्मचाऱ्यांबरोबरच मालकालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या कंपन्या नवीन कर्मचारी (पहिल्यांदा काम करणारे तरुण) भरतील, त्यांना सरकार आर्थिक प्रोत्साहन देणार आहे. जर एखादी कंपनी EPFO मध्ये नोंदणीकृत असेल आणि नवीन कर्मचारी नियुक्त करत असेल तर प्रत्येक नवीन कर्मचाऱ्याला दरमहा 3,000 रुपयांपर्यंत मदत मिळेल. हे प्रोत्साहन दोन वर्षांसाठी देण्यात येणार आहे. पण त्यासाठी काही अटी आहेत.
योजनेच्या अटी काय?
50 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कंपन्यांना किमान 2 नवीन कर्मचारी नियुक्त करावे लागतील.
50 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांना किमान 5 नवे कर्मचारी घ्यावे लागतील.
कर्मचाऱ्याला कमीत कमी 6 महिने नोकरीत राहावे लागेल, जेणेकरून कंपनीला हे प्रोत्साहन मिळू शकेल.
ऑगस्टपूर्वी पहिली नोकरी मिळालेल्यांना लाभ मिळेल का?
ही योजना 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे 01 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या कालावधीत पहिली नोकरी मिळालेल्या तरुणांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 1 ऑगस्टपासून पहिल्यांदा ईपीएफओमध्ये नोंदणी करणाऱ्यांना हा लाभ दिला जाणार आहे. जर तुमची नोकरी ही योजना सुरू होण्याआधी असेल, पण तुम्ही 1 ऑगस्टनंतर ईपीएफओकडे नोंदणी केली असेल तर तुम्हीही याचा लाभ घेऊ शकता.
कंपन्यांना किती प्रोत्साहन मिळणार?
कंपन्यांना 10,000 रुपयांपर्यंतच्या वेतनावर दरमहा 1,000 रुपये, 10,000 ते 20,000 रुपयांच्या वेतनावर दरमहा 2,000 रुपये आणि 20,000 ते 1 लाख रुपयांपर्यंतच्या वेतनावर दरमहा 3,000 रुपये प्रोत्साहन मिळेल. हे 2 वर्षांसाठी उपलब्ध असेल, परंतु कर्मचाऱ्याला कमीतकमी 6 महिने नोकरीत राहावे लागेल.