Friday, July 4, 2025
Homeकोल्हापूरमुल्ला सरांचे विद्यार्थिनींशी अश्लील कृत्य प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी नोंदवले मुलींचे जबाब;...

मुल्ला सरांचे विद्यार्थिनींशी अश्लील कृत्य प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी नोंदवले मुलींचे जबाब; व्हायरल व्हिडिओमुळे पालकांची नाराजी

शालेय विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याबद्दल निसारीअहमद मुल्ला या शिक्षकाला जमावाने काल चोप दिला. त्याला न्यायालयाने आज तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. संबंधित शाळेत जाऊन आज मुरगूड पोलिसांनी मुलींचे जबाब नोंदवले.

 

शिक्षकांचे कामकाज आणि विद्यार्थ्यांची माहिती घेतली. शाळेत घडलेल्या कालच्या घटनेमुळे आज विद्यार्थी संख्या कमी राहिली. काही पालकांनी स्वतः आपल्या मुलांना शाळेत आणून सोडले. शिक्षकांनी संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांची भेट घेऊन संस्था प्रतिनिधींसमवेत पालक मेळावा घेण्याचा निर्णय घेतला.

 

यावेळी पालकांनी शाळेबद्दल विश्वास व्यक्त केला. मारहाणीचे व्हिडिओ समाज माध्यमांत जाताना सोबत चुकीची माहिती प्रसारित झाल्याने पालकांनी खंत व्यक्त केली. संबंधित शिक्षकावर याआधी तक्रार होती, मग शाळा प्रशासनाकडून त्याला जाब का विचारला गेला नाही, याचीही चर्चा सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रियांका वाकळे यांनी शाळेत भेट देऊन विद्यार्थिनी आणि शिक्षकांकडून माहिती घेतली.

 

काय आहे नेमकं प्रकरण?

 

सेनापती कापशी येथील एका विद्यालयातील शिक्षकाने इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलींशी वारंवार अश्‍लील वर्तन केले. हे पालकांना समजल्यावर चिडलेल्या पालकांनी आज मोठ्या जमावाने शाळेत जाऊन त्याला बेदम चोप दिला. निसारीअहमद मोहिद्दिन मुल्ला (वय ५२, रा. सेनापती कापशी) असे त्याचे नाव आहे. मुरगूड पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी कापशी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.

 

याबाबत अधिक माहिती अशी, निसारीअहमद मुल्ला हा सुमारे दहा वर्षे येथे सहायक शिक्षक म्हणून काम करत आहे. तो मुलींशी अश्‍लील वर्तन करतो, वारंवार चुकीचे शब्द वापरतो, यावर पालकांत चर्चा होती. दोन दिवसांपूर्वी त्याच्याकडून घडलेले वर्तन मुलींनी आपल्या पालकांना सांगितले. त्यानंतर पालकांनी याबाबत शाळेत मुख्याध्यापक संभाजी माने यांना सांगितले होते. तरीही कारवाई झाली नसल्याने पालक आज आक्रमक झाले.

 

सकाळी साडेअकरा वाजता प्रार्थना झाल्यावर मुल्ला याला क्रीडांगणावर बोलावून घेतले आणि महिला, पालक आणि तरुणांनी बेदम चोप दिला. त्यानंतर मुरगूड पोलिस दाखल झाले आणि त्याला ताब्यात घेतले. जमाव मोठा झाल्याने पोलिसांची तुकडीच येथे दाखल झाली. दरम्यान, तरुणांनी कापशी बंदची हाक दिल्याने सायंकाळपर्यंत वातावरण तणावपूर्ण राहिले.

 

वारंवार असे कृत्य करणाऱ्या आणि शाळेला बदनाम करणाऱ्या शिक्षकावर कडक कारवाई करा, अशी मागणी जमावाने पोलिसांकडे करून गाडीला घेरले. पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार आणि पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर गाडी सोडली. यावेळी पालकांना आवर घालताना रक्तदाब कमी होऊन भोवळ आल्याने शाळेचे पर्यवेक्षक यशवंत यादव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -