पुण्यातील भयानक गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून स्वारगेट येथील बस स्थानकात तरूणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पुणं पुन्हा हादरलं आहे. कारण कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या 22 वर्षांच्या तरूणीवर, एका कुरिअर बॉयने बलात्कारा केल्याच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी कुरिअर बॉयने तिच्या तोंडावर स्प्रे मारला, तिच्या घरात घुसला आणि अत्याचार केला. एवढंच नव्हे तर या घृणास्प कृत्यानंतर आरोपीने तिचाच मोबाईल घेऊन एक सेल्फी काढला आणि मी पुन्हा येईन अशी धमकी टाईप करून अखेर तो पसार झाला. शहरात घडलेल्या या अत्यंत हादरवणाऱ्या घटनेमुळे कोंढवा परिसरासह पुणे शहरातही प्रचंड खळबळ माजली असून नागरिक दहशतीखाली आहेत.
स्प्रे मारून अत्याचार, मोबाईल मध्ये सेल्फी… नराधमाची धमक वाढली !
याप्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोँढवा परिसरातील एका सोसायटीत राहणाऱ्या 22 वर्षांच्या तरूणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी 7.30च्या सुमारास अत्याचाराची ही घटना घडली. आपण कुरिअर बॉय असून डिलीव्हरी देणयाकरता आल्याचे त्याने सोसायटीमध्ये सांगितलं,बँकेकडून एक एनव्हलप द्यायचे आहे, असे त्याने नमूद केलं. खोटी ओळख सांगून तो सोसायटीत शिरला.
पीडित महिलेच्या घरी गेल्यावर त्याने कुरिअर आलंय असं त्या तरूणाला सांगितलं. मात्र हे कुरिअर माझं नाही असं तरूणीने त्याला सांगितलं. तरीही तुम्हाला सही करावी लागेल असं त्या तरूणाने पीडितेला सांगितलं. त्यामुळे सही करण्यासाठी तिने सेफ्टी डोअर उघडलं असता आरोपीने तिच्या तोंडावर स्प्रे मारला. तो तिच्या घरात शिरला आणि तिच्यावर बलात्कार केला. एवढंच नव्हे तर अत्याचारानंतर त्याने त्या पीडित तरूणीचा मोबाईल घेत त्यामध्ये एक सेल्फी काढला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्या मोबाईलमध्ये त्याने मी परत येईन, असा धमकीचा मेसेजही टाईप केला, अशी माहिती उघड झाली आहे. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाला.
अत्याचारानंतरही पीडितेने हिंमत दाखवत याप्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सगळा प्रकार सांगत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या गुन्हे शाखेची आणि स्थानिक पोलिस स्टेशनची पथकं यावर काम करत त्या नराधम गुन्हेगाराचा कसून शोध घेत आहेत.